Chakur Bus Stand : चाकूर बसस्थानक बनले दुचाकी पार्किंगचे आगार!

दिवसभर खासगी वाहनांचा मुक्काम; आगार प्रशासनाचे दुर्लक्ष, प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
Chakur Bus Stand
Chakur Bus Standpudhari photo
Published on: 
Updated on: 

संग्राम वाघमारे

चाकूर : प्रवाशांच्या सोयीसाठी असलेले चाकूर बसस्थानक सध्या खासगी दुचाकींचे अनधिकृत पार्किंगस्थळ बनले आहे. बसस्थानकाच्या आवारात दररोज मोठ्या संख्येने दुचाकी उभ्या केल्या जात असून, आगार प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार वाढत असल्याची चर्चा नागरिकांतून होत आहे.

अनेक वाहनधारक बसस्थानकात दुचाकी लावून दिवसभर गायब होतात. त्यामुळे एसटी बसेसच्या येण्या-जाण्यास अडथळे निर्माण होण्यासह प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना बसस्थानक परिसरातून ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Chakur Bus Stand
Latur News : उदगीर तालुक्यातील ८७ ग्रा.पं.च्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर

बेशिस्त पार्किंगमुळे अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही.बसस्थानक हे प्रवाशांच्या वाहतुकीसाठी आहे की खासगी वाहनांच्या पार्किंगसाठी, असा सवाल उपस्थित होत आहे. वाहनांना पार्किंगची परवानगी, वेळमर्यादा आणि शुल्क याबाबत स्पष्ट नियम नसल्याने परिसरात कोणाचेही नियंत्रण नसल्याचे चित्र आहे.

बसस्थानकात स्वतंत्र पार्किंग व्यवस्था उभारून अधिकृत निविदेद्वारे व्यवस्थापन सोपवावे, पार्किंग शुल्कातून महामंडळाला उत्पन्न मिळवून द्यावे, तसेच अनधिकृत वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी प्रवासी व नागरिकांतून होत आहे.

Chakur Bus Stand
Beed Road Accident : रेसच्या नादात आमच्या आई-वडिलांचा बळी

दुर्घटनेनंतरच प्रशासन जागे होणार?

प्रवाशांच्या सुरक्षिततेशी संबंधित या प्रश्नाकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. एखादी दुर्घटना घडल्यानंतरच नियमावली आणि कारवाईची औपचारिकता पूर्ण होणार का? की त्यापूर्वीच बसस्थानकाला खासगी वाहनांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी ठोस पावले उचलली जाणार, याकडे चाकूरकरांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.