

चाकूर : चाकूर शहरात जुन्या वादाच्या कारणावरून एका तरुणावर अत्यंत गंभीर स्वरूपाचा हल्ला झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. या हल्ल्यात धर्मेंद्रसिंग या तरुणाच्या पोटात बियरची बाटली खुपसून त्याला गंभीर जखमी करण्यात आले. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकूर येथील राजेश बालू मुकुटमोरे आणि मेहबुब शेख या दोघांनी पूर्वीच्या भांडणाचा राग मनात ठेवून शनिवारी दुपारी १२ वाजता धर्मेंद्रसिंग यास शिवीगाळ केली व लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यावेळी त्याला जिवे मारण्याची धमकीही देण्यात आली. त्यानंतर सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास धर्मेंद्रसिंग हा मार्केटमध्ये जात असताना, "तु परत आमच्या दुकानासमोरून का जातोस?" असे म्हणत त्याला एकतानगर येथील महादेव मंदिराच्या मागे नेण्यात आले. तेथे राजेश मुकुटमोरे आणि मेहबुब शेख यांनी संगनमताने बियरची बाटली फोडून ती धर्मेंद्रसिंगच्या पोटात खुपसली. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेमुळे चाकूर शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. या प्रकरणी शोभा बदामसिंग शिकलकर यांच्या फिर्यादीवरून राजेश बालू मुकुटमोरे आणि मेहबुब शेख या दोघांविरुद्ध चाकूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पंकज निळकंठे करीत आहेत.