

Chachur Nagar panchyat 'Namo Udyan' is being realized in MIDC
संग्राम वाघमारे
चाकूर : चाकूर शहरातील नागरिकांना दर्जेदार विरंगुळा, आरोग्यदायी वातावरण आणि मुलांसाठी सुरक्षित मनोरंजनाची सुविधा उद्देशाने सहकारमंत्री उपलब्ध करून देण्याच्या बाबासाहेब पाटील यांच्या प्रयत्नातून नगरपंचायतीच्या वतीने एमआयडीसी परिसरात सुमारे ९८ लाख रुपये खर्चुन 'नमो उद्यान' उभारण्यात येत आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाला नुकतीच सुरुवात झाली असून, या उद्यानामुळे शहराच्या सौंदर्यात मोठी भर पडणार आहे.
प्रस्तावित नमो उद्यानामध्ये आकर्षक हिरवळ, पायी चालण्यासाठी सुसज्ज वॉकिंग ट्रॅक, पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा, सुशोभीकरण, वृक्षारोपण, बालकांसाठी स्वतंत्र खेळाचे उद्यान, खुली व्यायामशाळा, शौचालय इमारत तसेच अत्याधुनिक विद्युतीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय उद्यानात सीसीटीव्ही सुरक्षा व्यवस्था, पाणीपुरवठा आणि आवश्यक मूलभूत सुविधा उभारण्यात येणार असल्याने नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार वातावरण मिळणार आहे.
सकाळ-सायंकाळ फिरण्यासाठी, व्यायाम करण्यासाठी तसेच कुटुंबीयांसमवेत विरंगुळ्याचे क्षण घालविण्यासाठी हे उद्यान शहरवासीयांसाठी आदर्श ठरणार आहे. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांसाठी उपयुक्त अशा आधुनिक सुविधा येथे उपलब्ध होणार असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. चाकूर शहरात प्रथमच आधुनिक स्वरूपाचे 'नमो उद्यान' साकारत असल्याने शहराच्या विकासात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार असून, हे उद्यान भविष्यात नागरिकांचे आकर्षणाचे प्रमुख केंद्र ठरणार असल्याचे मुख्याधिकारी प्रतीक लंबे यांनी पुढारीशी बोलताना सांगितले.