

बालाजी फड, लातूर
लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत तुल्यबळ उमेदवार देण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी बैठकांचा धडाका लावला आहे. नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकीत भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस युतीला मिळालेले यश महानगरपालिका निवडणुकीत कायम राहावे, अशी भूमिका भाजपासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची असल्यामुळे लातूरमध्ये सत्ताधारी मित्र पक्षांची युती होण्याचे संकेत आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील मित्र पक्षांमध्ये अजूनही चर्चेचे निमंत्रण एकमेकांना नाही. त्यामुळे आघाडीत बिघाडीची शक्यता आहे.
लातूर महापालिकेसाठी १५ जानेवारी रोजी निवडणूक होणार आहे. २१ डिसेंबर रोजी झालेल्या नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसला जनतेने कौल दिल्याने होऊ घातलेली महानगरपालिका निवडणूक युतीतून लढवावी, असे स्पष्ट आदेश वरिष्ठ नेत्यांनी दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर युती करण्यासंदर्भात सकारात्मक बैठक पार पडली.
या बैठकीत विविध विषयांवर चर्चा होऊन आगामी महापालिका निवडणुका एकत्रितपणे लढण्याच्या अनुषंगाने अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. तसेच याबाबत एकमत झाले. लवकरच या युतीवर अधिकृत शिक्कामोर्तब होईल, असे भाजपाचे लातूर महानगरपालिका निवडणूकप्रमुख तथा माजी मंत्री आ. संभाज- ीराव पाटील निलंगेकर यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर पोस्ट करून युतीचे संकेत दिले आहेत. मात्र या पोस्टमध्ये शिवसेनेचा उल्लेख नसल्यामुळे भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच युती होणार हे निश्चित मानले जात आहे. या संयुक्त बैठकीला राज्याचे माजी मंत्री आमदार संजय बनसोडे, आमदार रमेशअप्पा कराड, आमदार विक्रम काळे, माजी खासदार डॉ. सुनील गायकवाड, शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर, माजी शहर जिल्हाध्यक्ष देवीदास काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस व्यंकट बेद्रे, शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन दाणे हे महायुतीसाठी आग्रही आहेत. परवाच आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्याशी चर्चा झाली आहे. महायुतीसंदर्भात दोन दिवसांत निर्णय होईल. आमचीही तयारी चालू असून बेचाळीस उमेदवारांच्या मुलाखती झाल्या आहेत. महायुती न झाल्यास आम्ही स्वबळावर लढू, असे सचिन दाणे म्हणाले.
शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख ॲड. बळवंतराव जाधव यांनी लातूरच्या हितासाठी नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. भाजपकडून चर्चेसाठी अजून बोलणे झाले नसल्याचे सांगितले. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचेही तळ्यात मळ्यात दिसत आहे. महापालिकेत महायुतीला तुल्यबळ टक्कर देणारा काँग्रेस पक्ष आहे. त्यांच्याकडे सर्वच जागांसाठी प्रबळ दावेदार आहेत. त्यामुळे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला ते किती जागा देतील याची शाश्वती राष्ट्रवादी व ठाकरे शिवसेनेला नसल्यामुळे आघाडी होईल की नाही, हे स्पष्ट सांगता येत नाही. काँग्रेस सध्या आपल्या इच्छुक उमेदवारांशी चर्चेत मग्न आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून आघाडी करण्यासंदर्भात अजूनही बोलणे झालेली नाही किंवा काँग्रेसकडून राष्ट्रवादी काँग्रेसला त्या संदर्भात बोलणे झालेले नाही. शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार विनायकराव पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसने आम्हाला चर्चेला अद्याप बोलावलेले नाही. आम्हाला त्यांनी बोलवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
ठाकरे शिवसेनाचे पदाधिकारी विष्णुपंत साठे, बालाजी जाधव, सुनील बसपुरे, सुनिता चाळक आदी पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांची काल भेट घेऊन महानगरपालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात सविस्तर चर्चा केली. काँग्रेसने महापालिका निवडणुकीत शिवसे-नेला सोबत घ्यावे. आमच्या पाच-सहा जागा निवडून येऊ शकतात. सोवत घेतले नाही तर आम्ही मशाल घेऊन लढणार असल्याचे माजी नगरसेवक विष्णुपंत साठे यांनी सांगितले.
समविचारी पक्षांना सोबत घेण्याची तयारी: विनायकराव पाटील
लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी करण्यासंदर्भात अद्याप चर्चा झालेली नाही व काँग्रेसकडून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसला चर्चेसाठी निमंत्रण आलेले नाही. महाविकास आघाडी न झाल्यास आमची स्वबळावर लढण्याची आजही तयारी आहे. सोबत येतील त्या समविचारी राजकीय पक्षांना घेऊन निवडणूक लढवू, असे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष व माजी आ. विनायकराव पाटील यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. महापालिका निवडणुकी संदर्भात महाविकास आघाडी करण्यासाठी काँग्रेसने अद्याप बोलावलेले नाही. त्यांच्याकडून बोलावणे आले तर आम्ही जाऊ. सगळ्यांची ताकद एकत्र आली तर लातूरमध्ये विरोधकांना आव्हान देऊ शकतो, असे सांगून माजी आमदार विनायकराव पाटील यांनी महाविकास आघाडी होणे गरजेचे असल्याचे नमूद केले. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडे महापालिका निवडणुकीसाठी ५० इच्छुकांनी उमेदवारी मागितली आहे. सध्या उमेदवारांची चाचणी चालू असून निवडून येणाऱ्यांची क्षमता पाहून उमेदवारी दिली जाणार आहे. आम्ही नवीन चेहऱ्यांना संधी देणार आहोत. कारण नवीन चेहरे लातूरचा विकास करू शकतील, असे ते म्हणाले.