गरिबीशी झुंज देत ऋतुजाची जागतिक भरारी; भारताला सुवर्णपदक !

पानगावच्या लेकीने भूतानमध्ये फडकवला तिरंगा; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा
latur news
गरिबीशी झुंज देत ऋतुजाची जागतिक भरारी; भारताला सुवर्णपदक !file photo
Published on: 
Updated on: 

Battling poverty, Rutuja soars to global heights; a gold medal for India

विठ्ठल कटके

रेणापूर : घरची हलाखीची परिस्थिती, वडिलांकडे अवघी पाऊण एकर जमीन आणि आई-वडिलांच्या मजुरीवर चालणारा संसार... अशा प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत पानगावच्या ऋतुजा भीमाशंकर उरगुंडे हिने भूतानमध्ये भारताचा तिरंगा अभिमानाने उंचावला. आशियाई डायरेक्ट व्हॉलीबॉल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत तिने सुवर्णपदक पटकावले. तिच्या या यशाने पानगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असून, ग्रामीण भागातील जिद्दी खेळाडूंच्या स्वप्नांना नवी उमेद मिळाली आहे.

latur news
Latur News : शेतकरी बांधवांनो, खचून जाऊ नका; शासन तुमच्या पाठीशी !

११ ऑक्टोबर रोजी झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने नेपाळवर मात केली. नेपाळला रौप्य, तर श्रीलंकेला कांस्यपदक मिळाले. महाराष्ट्रातून सोलापूरच्या दोन खेळाडूंसह मराठवाड्यातील ऋतुजाने भारताचे प्रतिनिधित्व केले. लहानपणापासून व्हॉलीबॉलची आवड जोपासणाऱ्या ऋतुजाने प्रतिकूल परिस्थितीला हार न मानता हे यश संपादन केले. ऋतुजाचे प्राथमिक शिक्षण पानगाव येथे झाले.

सध्या ती लातूरमध्ये कला शाखेच्या तृतीय वर्षात शिकत आहे. शिक्षणासोबतच तिने व्हॉलीबॉलचा सराव सुरू ठेवला. २०२१-२२ मध्ये ४० वी, २०२२-२३ मध्ये ४१ वी आणि २०२३-२४ मध्ये ४२ वी ज्युनियर राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेत सहभागी होत तिने आपल्या खेळाची गुणवत्ता सिद्ध केली.

सातत्यपूर्ण मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळवली आणि त्याचे सुवर्णपदकात रूपांतर केले. ऋतुजाचे वडील भीमाशंकर, आई अनिता यांच्यासह माजी सभापती चंद्रचूड चव्हाण, किरण चव्हाण, बाबा हलकुडे, सरपंच ज्योती भंडारे, उपसरपंच गोविंद दुडे, चेअरमन गणेश वांगे, उत्तरेश्वराप्पा हलकुडे, शहाजी आचार्य, मुरलीधर डोणे, सिद्धेश्वर गालफाडे, आबा हलकुडे, रुक्साना मुल्ला, कमल हलकुडे, काजल साखरे आणि किसन कुरे यांच्यासह अनेकांनी तिचे कौतूक केले.

latur news
Latur News : उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर अन् पर्यायी उपाययोजनांचे सूक्ष्म नियोजन करा

भूतानला जाण्यासाठीही पैसे नव्हते

ऋतुजाच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. वडिलांकडे अवघी पाऊण एकर जमीन आणि आई-वडील मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली; पण भूतानला जाण्यासाठी लागणाऱ्या खर्चाची व्यवस्था करणे तिच्यासाठी मोठे आव्हान ठरले. पैसे नसल्याने तिचा दौरा रद्द होण्याची वेळ आली होती. मात्र, पानगावातील काही दानशूर व्यक्तींनी आपली नावे जाहीर न करण्याच्या अटीवर तिला आर्थिक मदत केली. या बांधिलकीने ऋतुजाला भूतानला जाता आले. या लेकीने अखेर सुवर्णपदक जिंकून गावकऱ्यांच्या विश्वासाचे सोने केले. तिची ही कहाणी केवळ पदकापूर्ती नाही, तर परिस्थितीवर मात करणाऱ्या स्वप्नांची आणि गावाच्या माणुसकीचीही आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news