

Latur News : Use the available water sparingly and make careful planning of alternative measures
लातूर, पुढारी वृत्तसेवा : अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांतील पाणीसाठा घटला असून, भूजल पातळीही सुमारे ४.५८ मीटरने खाली गेली आहे. या पार्श्वभूमीवर काटकसरीने वापर करून पुढील सहा ते आठ महिन्यांचे सूक्ष्म नियोजन करावे. पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देत टंचाई निवारणासाठी पर्यायी जलस्रोत तातडीने निश्चित करावेत, असे निर्देश पालक सचिव तथा गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांनी दिले.
उपलब्ध पाण्याचा जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी दुष्काळ आणि पीक नुकसानीच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुलकुमार मीना, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, महानगरपालिका आयुक्त राहुल कुलकर्णी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. प्रकल्पनिहाय पाणी आरक्षण लक्षात घेऊन पुढील ऑगस्टपर्यंतचे नियोजन करावे.
त्या कालावधीपर्यंत पाणी पुरणार नसलेल्या भागांत पर्यायी जलस्रोत शोधून आराखडा तयार करावा. शहरांपासून ग्रामीण भागापर्यंतच्या विहिरी, कूपनलिका आणि हातपंपांची तातडीने दुरुस्ती करावी. जलजीवन मिशनमधील अपूर्ण योजना लवकर कार्यान्वित कराव्यात, अशा सूचना म्हैसकर यांनी दिल्या. खरीप पिकांच्या नुकसानीचे पंचनामे अचूकपणे पूर्ण करून पीक कापणी प्रयोगांना गती द्यावी. पशुधनासाठी चारा उपलब्ध राहावा, यासाठी नियोजन करावे. रब्बी हंगामात पाणी उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांना चारा लागवडीसाठी प्रोत्साहित करावे.
रोजगार हमी योजनेतून जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देऊन गरजूंना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून द्यावा. अवैध सावकारी रोखण्यासाठीही कठोर उपाययोजना कराव्यात, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात सध्या टंचाईग्रस्त गावांमध्ये २२० विहिरी व कूपनलिकांचे अधिग्रहण करून पाणीपुरवठा सुरू आहे. सुमारे १०० दिवस पुरेल इतका चारा उपलब्ध असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड यांनी दिली. दरम्यान, म्हैसकर यांनी पेठ शिवारात जाऊन सोयाबीन आणि तूर पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीची माहिती घेतली आणि त्यांना धीर दिला.