

Visiting the fields to inspect crop damage suffered by drought-stricken farmers
लातूर, पुढारी वृत्तसेवा : मोठ्या आशेने पेरलेले बियाणे, पिकांसाठी केलेला खर्च, दिवसरात्र घेतलेली मेहनत आणि डोळ्यांत साठवलेली सुखी संसाराची स्वप्ने... पावसाने पाठ फिरवल्याने हे सारेच संकटात सापडले आहे. शेतातील उभी पिके करपली, हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आणि आता पुढील हंगाम कसा घ्यायचा, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, जनावरांसाठी चारा कुठून आणायचा?, असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहेत. या कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांनी हताश होऊ नये. खचून जाऊन आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये. राज्य शासन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, अशी भावनिक साद पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शेतकऱ्यांना घातली.
लातूर जिल्ह्यातील दुष्काळ आणि पीक नुकसानीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्र्यांनी विविध गावांतील शेतांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. अहमदपूर तालुक्यातील महादेववाडी, चाकूर तालुक्यातील आष्टा मोड, उदगीर तालुक्यातील शेकापूर, जळकोट तालुक्यातील बेळसांगवी तसेच लातूर तालुक्यातील कोळपा आणि महाराणा प्रतापनगर येथे त्यांनी नुकसानीची पाहणी केली.
वयोवृद्ध शेतकरी आणि महिलांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून त्यांना धीर दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुष्काळी परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, बाधित शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. पीक नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना कृषी आणि महसूल विभागाला देण्यात आल्या आहेत. पीक नुकसानीसाठी शासनाकडून मदत देण्यासोबतच पीकविमा कंपनीकडून जास्तीत जास्त भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील.
एकही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. दुष्काळाचे संकट केवळ शेतातील पिकांपुरते मर्यादित नसून आगामी काळात पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विंधन विहिरी, जुन्या विहिरींची दुरुस्ती, पर्यायी जलस्रोतांचा शोध आणि चारा उपलब्धतेसाठी नियोजन करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत. दुष्काळ जाहीर झाल्यानंतर लागू केलेल्या सवलतींची प्रभावी अंमलबजावणी करण्यासह विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कमाफीबाबतही कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या पाहणी दौऱ्यात सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, आमदार संजय बनसोडे यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्ष उषापाटील, उपाध्यक्ष दयानंद सुरवसे, विविध लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते.
शेतकऱ्यांनो, आयुष्य संपवू नका
दुष्काळामुळे नुकसान झाले म्हणून शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये. राज्य शासन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. पीक नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. पीकविम्याचा लाभमिळवून देण्यासही शासन कटिबद्ध आहे. एकही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.