

Assault at Dhaba: Three Sent to Two-Day Police Custody
रेणापूर, पुढारी वृत्तसेवा रेणापूर पिंपळफाटा येथील एका ढाब्यावर जे वणाच्या बिलावरून वाद होऊन झालेल्या मारहाणीत एकजन गंभीर जखमी झाला असून रेणापूर पोलिसांनी यातील तिघांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी आरोपींची पिंपळफाटा परिसरात धिंड काढली.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २४ मार्च २०२६ रोजी दुपारच्या सुमारास पिंपळफाटा येथील एका ढाब्यावर जेवणाच्या बिलावरून वाद निर्माण झाला. या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. गैरकायद्याची मंडळी जमवून ढाब्यावर काम करणाऱ्या सुनील केदार वासकले यांच्यावर तीक्ष्ण हत्यार व लाटण्याने हल्ला केला.
यात वासकले हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर लातूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी जखमी सुनील वासकले यांच्या फिर्यादीवरून रेणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरली व या प्रकरणातील तिघांना अटक करून त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधाकर देडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.