

Ahmedpur Municipal Council general elections BJP NCP
अहमदपूर, पुढारी वृत्तसेवा अहमदपूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अभय बळवंत मिरकले हे भाजपाच्या अॅड. स्वप्नील महारुद्र व्हत्ते या नवख्या उमेदवारांकडून पराभूत झाले असून २५ नगरसेवकांचे बलाबल असलेल्या या नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे १६ उमेदवार विजयी झाले आहेत.
विद्यमान नगरपरिषदेत सर्वात मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुढे आली असली तरी नगराध्यक्ष पदाचा त्यांचा उमेदवार पराभूत झाल्यामुळे गड आला पण सिंह गेला अशी म्हणण्याची वेळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आलेली आहे.
निवडणुकीच्या प्रारंभीच जागावाटपावरून सत्तेत असलेल्या भाजपाचे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बिनसले होते. सहकार मंत्री बाबासाहेव पाटील यांनी २५ जागांवर आपले उमेदवार उभे केले होते, तर सत्तेतील मित्र पक्ष असलेल्या भाजपाने नगराध्यक्ष पदाचा स्वतंत्र उमेदवार उभा करत नगरसेवक पदासाठी त्यांनी १९ उमेदवार उभे करून दंड थोपटले होते.
माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांना सोबत घेऊन महाविकास आघाडीची मोट बांधून सहकार मंत्री बाबासाहेव पाटील यांना शह दिला होता. त्यातच त्यांच्या पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराने ऐनवेळी निवडणुकीत माघार घेतल्याने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे शेख कलिमोद्दीन अहमद हकीम यांना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून महाविकास आघाडीकडून घोषित करण्यात होते.
अनेक दिग्गज अहमदपूर येत निवडणूकीच्या प्रचाराचा राळ उडवून दिली होती. राजकीय विश् लेषकांनी ही निवडणूक तिरंगी होईल असा कयास बांधला होता. निकालावरून तर अनेकांच्या भुवया उंचावल्या असून भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अॅड. स्वप्नील महारूद्र व्हत्ते यांनी ९३९० मते घेऊन त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अभय बळवंत मिरकले यांचा ७१८ मतांनी पराभव केला. अभय मिरकले यांना ८६७२ तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे शेख कलिमोद्दीन अहमद हकीम यांना ७६९९ मते मिळवत लक्ष्य वेधून घेतले.
नगरपरिषदेतील पक्षीय बलावल पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे १६ नगरसेवक निवडून आले आहेत त्याखाल- ोखाल भाजपाचे ३ शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ३ तर, उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे २ तर शिवसेनेचा १ नगरसेवक निवडून आला आहे. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला मात्र खातेही खोलता आले नाही.