

70 percent reservation for locals in district bank recruitment
लातूर, पुढारी वृत्तसेवा : राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या भरती प्रक्रियेत आता स्थानिक भूमिपुत्रांना मोठी संधी मिळणार आहे. सहकार विभागाने शुक्रवारी (दि. ३१) घेतलेल्या निर्णयानुसार, संबंधित जिल्ह्यातील रहिवासी उमेदवारांसाठी तब्बल ७० टक्के जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत. हा निर्णय आधीपासून सुरु असलेल्या भरती प्रक्रियेलाही लागू होणार आहे.
या निर्णयासाठीलातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि माजी आमदार धिरज देशमुख यांनी राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.
राज्य शासनाने जिल्हा बँकांच्या भरती प्रक्रियेला पारदर्शक व वादमुक्त ठेवण्यासाठी ऑनलाईन पद्धती अनिवार्य केली आहे. काही बँकांनी ऑनलाईन भरतीप्रक्रिया सुरू केल्यावर स्थानिक उमेदवारांमध्ये अन्यायाची भावना निर्माण झाली होती. जिल्हा बँकांचे कार्यक्षेत्र जिल्ह्यापुरते मर्यादित असल्याने स्थानिक रहिवाशांनाच प्राधान्य मिळावे, अशी मागणी धिरज देशमुख यांनी केली होती.
त्यांच्या प्रयत्नांनंतर सहकार आयुक्तांनी स्थानिकांसाठी ७० टक्के व जिल्हाबाहेरील उमेदवारांसाठी ३० टक्के आरक्षणाचा प्रस्ताव शासनाला सादर केला. शासनाने हा प्रस्ताव मंजूर करत ७०-३० फार्मुला लागू केला आहे. या निर्णयामुळेराज्यातील सर्व जिल्ह्यांतील स्थानिक उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, जर ३० टक्के जिल्हाबाहेरील जागांसाठी पुरेसे उमेदवार उपलब्ध झाले नाहीत, तर त्या जागाही स्थानिक उमेदवारांकडून भरता येतील, अशी तरतूद शासन निर्णयात करण्यात आली आहे.