

Several people injured in wild animal attack in Devni; 6 injured
देवणी, पुढारी वृत्त्सेवा : सायंकाळी चार वाजेच्या सुमारास पंचायत समिती परिसरात एका हिंस्त्र प्राण्याने पाच ते सहा जणांना जबर चावा घेऊन गंभीर जखमी केले आहे. दरम्यान, जखमींना उपचारासाठी उदगीर येथे शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सदर प्राणी तरस अथवा लांडगा असल्याची चर्चा असून, वनविभाग त्याचा शोध घेत आहे.
याबाबत अधिकृत वृत्त असे की, शुक्रवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास पंचायत समिती परिसरात युनूस सरदार मिया मिर्झा (५५) यांना जबर जखमी केले. यानंतर त्याच परिसरात तीन वर्षांची मुलगी इनाया इस्माईल मल्लेवाले हिच्यावर हल्ला केला. तेथून तो देवनदीच्या किनारी गेला व तेथे फैजान फिरोज येरोळे या मुलावर हल्ला करून जखमी केले. यानंतर तेथून तो देवनदीच्या पलीकडे शेतीवर जाऊन तेथे चन्नप्पा राजप्पा भद्रशेट्टे (५५) यांना जबर जखमी केले. यानंतर त्याने कोतवाल यांच्या शेतीजवळ गोविंद माणिकराव म्हेत्रे यांना घायाळ केले आणि तेथून तो पुढे उत्तर दिशेला शेतशिवाराने निघून गेल्याची माहिती नागरिकांनी दिली. मात्र याच वेळेत हा हिंस्त्र प्राणी लांडगा की कोल्हा असा संभ्रम होत होता.
हा हिंस्त्र प्राणी लांडगा की कोल्हा असा संभ्रम होत होता. मात्र याच वेळेत उमरगा तालुक्यातील वाहतूकदार येथे कामानिमित्त आले असता त्यांना सदर घटना समजली. त्यांनी असे सांगितले की, सदर प्राणी हा तरस असावा कारण केरळ राज्यातून मोठ्या प्रमाणात हे प्राणी उमरगा तालुक्यात काही दिवसांपूर्वी आणून सोडले असून, तेथे असा धुमाकूळ सुरू असल्याचे सांगितले. यावरून हा प्राणी तरस असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. शिवाय सदर प्राण्यास पाहणाऱ्या प्रत्यक्ष दर्शीच्या वर्णनावरून तरस असल्याचे निष्पन्न होत आहे.
या घटनेची शहरात चर्चा सुरू झाल्यानंतर वेगवेगळी माहिती समोर येत आहे. येथील डॉक्टर संजय अटर्गेकर यांना पंधरा दिवसांपूर्वी निलंगा उदगीर या राज्य रस्त्यावर मौजे अजनी पाटीजवळ रात्री नऊ वाजेदरम्यान पंधरा दिवसांत दोनदा आढळून आल्याचे सांगितले. वन्यजीव अभ्यासक तथा कॉर्बेट फाउंडेशनचे संचालक केदार गोरे यांना देवणी येथून सीसीटी कॅमेऱ्यातून मिळालेले त्या प्राण्याचे छायाचित्र पाठवले असता त्यांनी हा लांडगा असल्याचे सांगितले. त्याची आक्रमकता पाहता तो पिसाळलेला असू शकतो असेही केदार यांनी म्हटले.