

लातूर, पुढारी वृतसेवा : महिलांच्या गळ्यातील मंगळसुत्र हिसकावणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 74.3 ग्रॅम सोन्याचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली चोरीची मोटरसायकल असा एकूण 3 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांच्याकडून सहा गुन्हे उघड झाले आहेत. रोहन उर्फ मिट्या मारुती गुंडले, (वय 19, रा. अंजनसोंडा), व अभंग काशिनाथ घोलपे, वय 29, रा. काळेवाडी ) अशी त्यांची नावे आहेत. (Latur News)
चोरी व चैन स्नॅचिंगच्या गुन्हयाबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे (Latur News) पथक जिल्ह्यातील विविध गुन्हेगारांची माहिती एकत्र करून त्याचे विश्लेषण करीत होते. दरम्यान, चोरलेले सोन्याचे दागिने जुने रेल्वे स्थानक परिसरात सराफांना विकण्याच्या प्रयत्नात दोघे असल्याची माहिती पथकाला मिळाली. तिथे पोलिसांनी छापा मारला व दोघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी मागील काही दिवसांपासून लातूर शहर व जिल्ह्यातील रस्त्याने जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसका मारून चोरल्याची कबुली दिली. जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांच्या अभिलेखाची माहिती घेतली असता त्यांच्याविरुध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात 2 गुन्हे, तर गांधी चौक ठाणे, लातूर ग्रामीण व उदगीर शहर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुध्द प्रत्येकी एक तसेच एमआयडीसी पोलीस ठाण्यात मोटरसायकल चोरीचा १ गुन्हा दाखल आहे.
हेही वाचा