लातूर : औरादला एका तासात ५६ मिलीमीटर पाऊस | पुढारी

लातूर : औरादला एका तासात ५६ मिलीमीटर पाऊस

औराद शहाजानी, पुढारी वृत्तसेवा : औराद शहाजानी व परिसरात एका तासात ५६ मिलीमीटर पाऊस झाला आहे. जून पासून आजपर्यंतचा हा पहिलाच मोठा पाऊस आहे. सोमवारी (दि.२४) सायंकाळी ५ वाजता पावसाला सुरूवात झाली व तासाभरात मोठा पाऊस झाला. त्यामुळे औरादसह परिसरातील ओढे – नाले तुडुंब भरून वाहत आहेत. औराद शहाजानी गावाच्या बसस्थानकासमोर मुख्य रस्त्यावरील पुलावरून पाणी जात असल्याने काही वेळ वाहतूक बंद होती. त्याचबरोबर औराद शहाजानी गावातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील गटारी व फुटपाथचे काम कंत्राटदाराने अर्धवट ठेवल्याने महामार्गालगतच्या अनेक घरे, दुकाने व महाराष्ट्र विद्यालयात रस्त्याचे पाणी जाऊन मोठे नुकसान झाले आहे.

मागच्या वर्षी पावसाळ्यात असेच नुकसान झाले होते. परंतु, कंत्राटदार याकडे दुर्लक्ष करीत आहे. वसंतराव पाटील विद्यालयाच्या मैदानावरही रस्त्याचे पाणी साचले आहे. तसेच औराद – तगरखेडा रस्त्यावरील ओढ्याला पाणी येऊन वाहतूक बंद झाली आहे. लातूर – हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावरील कर्नाटकाच्या जामखंडी येथील पर्यायी पुलावरून पाणी जात असल्याने या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंद आहे. येथे राष्ट्रीय महामार्गावरील नवीन पुलाचे काम सुरू असून पर्यायी रस्ता मोठ्या पावसाने पाण्याखाली गेला आहे.

हेही वाचलंत का?

 

Back to top button