

Yellow alert issued for cold wave in the district; mercury drops.
जालना, पुढारी वृत्तसेवा मुंबई येथील कुलाबा वेध-शाळेच्यावतीने जालना जिल्ह्यात बुधवार (१०) व गुरुवार (११) रोजी थंडीची लाट आल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान विभागाने जारी केलेल्या यलो अलर्ट नंतर जिल्हा प्रशासनाने नागरिकांनी आवश्यकता असल्यास घराबाहेर जावे अन्यथा घरीच थांबावे, थंडीपासून संरक्षण करण्यासाठी उबदार कपडे घालावेत, प्रसार माध्यमाव्दारे वेळोवेळी थंडीचा प्रतिकार करण्यासाठी दिलेली माहिती किंवा सूचना अमलात आण्याव्यात, एकटे राहणाऱ्या वयोवृद्ध शेजारच्या व्यक्तींकडे लक्ष द्यावे, गरम राहणाऱ्या किंवा इमारतीमधील जास्त हवा न येणाऱ्या खोलीमध्ये वास्तव्य करावे, रूम हिटरचा वापर करावा. गरम पेय घ्यावे व शरीर उष्ण राहण्यासाठी व थंडीच्या लाटेचा प्रतिकार करण्यासाठी शरीराला तयार करावे, विद्युत प्रवाह खंडित झाल्यास फ्रीजमधील खाण्याचे पदार्थ ४८ तास व्यवस्थित राहू शकतात.
फक्त त्याचा दरवाजा व्यवस्थित लागतो का ते पहावे व जास्त वेळा उघडू नये, थंडीपासून बचाव करण्यासाठी टोपी किंवा मफलरचा वापर करावा, रॉकेलचा स्टोव्ह किंवा कोळश्याची शेगडी वापरत असेल तर त्याचा धूर जाण्यासाठी खिडकी उघडी असावी अन्यथा दूषित धुरामुळे बाधा होऊ शकते, ताजे पदार्थ खावेत ज्यामुळे शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होईल.
मादक पदार्थ किंवा अल्कोहोल मिश्रित नसलेले पेय घ्यावेत, हिमबाधा झाल्याचे लक्षणे दिसताच डॉक्टरांना भेटावे, स्पर्श केल्यानंतर जाणीव होत नसल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.