

Police run bomb phone call railway station
जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवल्याच्या अफवेने पोलिस दलातील अधिकारी कर्मचारी तसेच बॉम्ब शोधक पथकाची मंगळवारी मध्यरात्री कडाक्याच्या थंडीत धावा-धाव झाली. पोलिसांनी रेल्वस्टेशन परिसर पिंजून काढूनही बॉम्ब सापडला नसल्याने बॉम्ब ठेवल्याची अफवाच असल्याचे समोर आले. दरम्यान या प्रकरणी पोलिस कंट्रोल रुमला आलेल्या क्रमांकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला..
जालना रेल्वे स्थानकावर बॉम्ब ठेवण्यात आला असल्याचा फोन कंट्रोल रुमच्या डायल क्र.११२ वर रात्री आला. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ रेल्वे स्थानकावर धाव घेतली. यावेळी शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरिक्षक प्रताप इंगळे, कदीम जालना पोलीस ठाण्याचे ताहेर शेख, नंदकिशोर टेकाळे, मुकेश पढे, उगले यांच्यासह तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी, रेल्वे आरपीएफ आणि बॉम्ब शोधक पथकांनी रात्री १२ ते ३ वाजेच्या दरम्यान रेल्वे स्थानकाचा संपूर्ण परिसर पिंजून काढला.
पोलिसांनी प्लटफॉर्मवरील बेंच खाली व इतर ठिकाणी तपासणी केली. यावेळी रेल्वेस्थानकात बाहेरगावी जाणाऱ्या व बाहेरगावाहुन आलेल्या प्रवाशांना पोलिसांच्या कारवाई बाबत कल्पना नसल्याने त्यांच्यात कुतूहल व भीती दोन्ही दिसून आली. पोलिसांनी रेल्वेस्थानकाचा चप्पा चप्पा शोधूनही कुठेच काही आढळून न आल्याने अखेर पोलिसांनी सुटकेचा निः श्वास सोडला.
अज्ञात इसमाच्या या फोनने काही काळ पोलिस व प्रवाशांची रात्रीची झोप उडाल्याचे दिसुन आले. या प्रकरणी कदीम जालना पोलिस ठाण्यात ज्या क्रमांकावरुन पोलिसांना रेल-वेस्टेशनवर बॉम्ब असल्याचे कळविण्यात आले होते त्या क्रमांकाविरुध्द तक्रार दाखल करण्यात आली आहे.
अज्ञात इसमाने केला फोन
जालना रेल्वेस्थानकात अज्ञात इसमाने केलेल्या फोन प्रकरणी कदीम जालना पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. बॉम्बच्या या फोनमुळे पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची रात्रभर धावाधाव झाल्याचे पहावयास मिळाले. सर्वत्र शोध घेऊनही काहीच न मिळाल्याने पोलिसांचा जीव भांड्यात पडला.