

War hits steel industry; price rises by Rs 3,000!
जालना, पुढारी वृत्तसेवा : मध्यपूर्वेत सुरू असलेल्या इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील तणावपूर्ण संघर्षाचा परिणाम आता जालना येथील स्टील उद्योगावरही दिसून येऊ लागला आहे. गल्फ देशांतून भारतात आयात होणाऱ्या स्क्रॅपच्या पुरवठ्यात घट झाल्याने जालन्यातील स्टीलच्या दरात सुमारे तीन हजार रुपयांनी वाढ झाल्याची माहिती उद्योग क्षेत्रातून समोर आली आहे.
स्टील हब म्हणून जालना शहर नावारूपाला आले आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाचे स्टील उत्पादन केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालना येथे मोठ्या प्रमाणात स्क्रॅपवर आधारित स्टील निर्मिती केली जाते. शहरातील अनेक रोलिंग मिल्स आणि स्टील कारखाने परदेशातून येणाऱ्या स्क्रॅपवर अवलंबून आहेत. मात्र सध्या गल्फ देशांतून येणाऱ्या कच्च्या मालाच्या पुरवठ्यावर युद्धपरिस्थितीचा परिणाम झाल्याने स्क्रॅपची आयात मंदावली आहे. परिणामी स्टील उत्पादक उद्योगांना कच्च्या मालाच्या टंचाईला सामोरे जावे लागत आहे.
याशिवाय कोळशाच्या दरात झालेल्या वाढीमुळे उत्पादन खर्चातही मोठी वाढ झाली आहे. कच्चा माल आणि इंधन या दोन्ही घटकांच्या दरवाढीचा परिणाम थेट स्टीलच्या किमतीवर होत असून बाजारात स्टीलचे दर जवळपास तीन हजार रुपयांनी वाढल्याचे व्यापारी व उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींनी सांगितले.
स्टील दरवाढीचा परिणाम बांधकाम क्षेत्रावरही होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लोखंड आणि स्टील महाग झाल्यास इमारत बांधकामाचा खर्च वाढू शकतो, त्यामुळे बांधकाम व्यावसायिक तसेच ग्राहकांनाही आर्थिक फटका बसू शकतो. जिल्हाभरात विविध बांधकामे सुरू आहेत. या बांधकामांनादेखील स्टीलच्या महागाईची झळ बसण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या या संघर्षाचा परिणाम स्थानिक उद्योगांवरही होत असल्याचे स्पष्ट झाले असून पुढील काही दिवसांत परिस्थितीनुसार स्टीलच्या दरात आणखी चढ-उतार होण्याची शक्यता उद्योग क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे.
स्क्रॅपच्या पुरवठ्यावर परिणाम
दरम्यान, कालिका स्टीलचे अध्यक्ष घनश्याम गोयल यांनी सांगितले की, "गल्फ देशांतून येणाऱ्या स्क्रॅपच्या पुरवठ्यावर युद्धपरिस्थितीचा परिणाम झाला आहे. त्याचबरोबर कोळशाच्या दरातही वाढ झाली असल्याने उत्पादन खर्च वाढला आहे. त्यामुळे स्टीलचे दर वाढणे अपरिहार्य झाले आहे."