

जालना ः शेतकऱ्यांची पहिली आत्महत्या 19 मार्च 1986 ला झाली होती. 1996 ते 2022 या काळात 96 हजार 240 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. दरवर्षी सरासरी दोन शेतकरी आत्महत्या करत आहेत. समाज स्वास्थ्यासाठी हा कलंक असून आज खंडीभर काव्य लिहिलं जातंय प्रेयसी, चांदणी तीच गाणी केव्हापर्यंत लिहिणार ?, प्राध्यापक कुटुंबापुरते जगतात. राजकारणी पुढच्या पिढ्यांसाठी इतरांची पाय कापत आहेत. वेदनेला जात नसते.शेतकरी, कष्टकऱ्यांच्या पाठीशी कवी, साहित्यिकांनी उभे राहण गरजेच आहे,असे परखड मत ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांनी व्यक्त केले.
येथील जेइएस महाविद्यालयाच्या प्रांगणात “दु:खी” राज्य काव्य आणि ना. धों. महानोर राज्य साहित्य पुरस्कारांचे वितरण गुरुवारी ( ता.19) सायंकाळी “कवितेचा पाडवा” या कार्यक्रमात विश्वास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.प्रसिद्ध उर्दू शायर राय हरिश्चंद्र साहनी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा “दु:खी” राज्य काव्य पुरस्कार कवी अशोक नायगावकर (रोख 25 हजार रुपये) यांना तर ना. धों. महानोर राज्य साहित्य पुरस्कार (रोख 10 हजार रुपये),ज्येष्ठ ललित लेखिका डॉ. मीनाक्षी पाटील यांना प्रदान करण्यात आला. यावेळी अभय साहनी,विनीत साहनी, डॉ. संजीवनी तडेगावकर, पंडितराव तडेगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
विश्वास पाटील याप्रसंगी म्हणाले, कवी हा शब्दसृष्टीचा जादूगार असतो. जटिल प्रश्न, समस्या समजून घेतात. शब्दांच्या इज्जतीसाठी स्वातंत्र्यानंतर एका कवीने तुरुंगवास भोगला असे त्यांनी सांगितले. सत्कारास उत्तर देतांना डॉ. मीनाक्षी पाटील यांनी बालपणापासून ते आतापर्यंत मिळालेल्या पुरस्कारांचा आनंद, जगण्याची धडपड आणि समाधान व्यक्त करत पुरस्काराची रक्कम धुळे येथील वि.का.राजवाडे संस्थेस देण्याची घोषणा त्यांनी केली.
कवी, लेखक, कलावंत कृतीतून भूमिका घेत असतात. संघर्ष हा जगण्याचा स्थायी भाव असून कमी अधिक तीव्र असतो.आपल जगण हीच कविता असल्याचे त्यांनी नमूद केले.डॉ.संजीवनी तडेगावकर यांनी पुरस्कार प्राप्त कवी, लेखकांचा परिचय देत माणसांना उगवून येण्यासाठी सुरू असलेल्या कवितेच्या पाडव्याची वाटचाल विषद केली.
विनीत साहनी यांनी स्वागतपर मनोगतात रसिकांची शक्ती,दाद आम्हाला बळ देते. सध्या युध्दाची धग कोणी विझवू शकेल पण कवितेतून लागणारी आग विझविण्याची हिंमत कोणात नाही असे सांगितले. निवेदन कवी धम्मपाल जाधव यांनी केले तर पंडितराव तडेगावकर यांनी आभार मानले.चित्रकार श्रीधर अंभोरे, छायाचित्रकार ज्ञानेश्वर गिराम, राहुल चक्रे, राजेंद्र पाटील यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.पावसाचे वातावरण असतांनाही रसिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती . कार्यक्रम स्थळी पक्षीमित्र ज्ञानेश्वर गिराम यांच्या पक्षांचे छायाचित्र प्रदर्शन भरविण्यात आले.
जगण्याच सौंदर्य शिकलं पाहिजे: नायगावकर
आपल्या आजूबाजूलाच असलेल्या सौंदर्याचा आस्वाद आपण घेत नाही. मॉलमधील वस्तूंना आम्ही विकले गेलो . फुलांचे वास विसरलो, पानांची पालवी पाहत नाही.परंपरेच्या जगण्यातील शूचिर्भूतता सोडून आधुनिक वस्तूंच्या आहारी गेल्याने जाण्यापासून दूर गेलो .असे खुसखुशीत मनोगत कवी अशोक नायगावकर यांनी व्यक्त केले. इसराइल, पॅलेस्टाईन मध्ये जर कवी असते तर आजच युद्ध झालं नसत,असे नमूद केले. कवी विश्वाचा असून संत परंपरा दिलेल्या मराठवाड्यात जाती-पातीचे सोडून ये हृदयीचे ते हृदही ही भूमिका घ्यावी अशी अपेक्षा नायगावकर यांनी व्यक्त केली.