

Unseasonal rains Anwasah area of Bhokardan taluka caused huge losses to farmers
आन्वा, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील आन्वासह परिसरात शुक्रवारी (दि. २४) रोजी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. कापसाच्या वाती झाल्या आहे. तर मकाच्या कणसाला अंकुर येण्याची शक्यता आहे.
जोरदार कोसळलेल्या पावसाने शेतातील मका, कपाशी पिकांचे प्रचड नुकसान झाले, शुक्रवारी रात्रीच्या सुमारास काही गावांमध्ये पावसाने जोरदार झोडपल्याने अनेक भागांत शेतातील पिके पाण्याखाली गेली.
सध्या मका पिकाची कापणी व कापूस वेचणी सुरू असून पावसाळ्यात कमी-अधिक पाऊस झाल्याने आधीच हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाने अक्षरशः डोळ्यांत पाणी आणले आहे.
सध्या मका पिकाची सोंगणीचा हंगाम सुरू असून सोंगणी करून टाकलेल्या मकाचे कणसे शेतात पडून आहे. मका सोंगून पडलेल्या पिकावर बसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान वाढले आहे. भागातील अनेक शेतकऱ्यांच्या कपाशी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मजुरांच्या अभावी तसेच रब्बी पावसाचा तडाखा पिकांच्या लागवडीमुळे शेतकरी विविध कामांत व्यस्त आहेत. ज्यामुळे कपाशी वेचणीची कामे मागे पडली असल्याने अनेक शेतकऱ्यांच्या कपाशीला बोंडे तशीच असून काल झालेल्या पावसामुळे कपाशीच्या झाडांच्या कापसाच्या वाती झालेल्या दिसून येत आहे.
रात्रीच्या पावसाने कापसाच्या वाती झाल्या असून कापसाचे नुकसान झाले आहे. उत्पन्न कमी असून पण या वर्षी कापसाला भाव नाही शासनाने आता तरी कापसाचे भाव वाढवावे. तसेच शासनाने लवकर पंचनामे करून पीक विम्याचे पैसे देत मदत करावी. अन्यथा शेतकरी आता शेती करायचं सोडून देईल अशी परिस्थितीत निर्माण झाली आहेत.
अवकाळी पाऊस, उत्पन्न कमी त्यात दर नाही
आस्मानी संकट शेतकऱ्यांना नवीन नाही. मात्र चालू वर्षी आधीच खरिपात पावसाने दांडी दिल्याने कपाशीचे उत्पन्न घटले असून आता अवकाळी पावसाने झाडाला असलेल्या कापसाच्या वाती केल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे ओले दुष्काळ उभे ठाकले आहे. पीक विमा भरून देखील ते पंचनामे वेळेत होत नाहीत. कधी विमाच मिळत नाही. आता सरकारने लवकरात लवकर शेतकरी हितार्थ निर्णय घ्यावा, अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे.