

All leaders should come together for development
जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षाने राजकीय मतभेद विसरून एकत्रित यावे, असे आवाहन माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले. जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमात ते बोलत होते.
जालना शहरात सामाजिक ऐक्य व आत्मीयतेचे प्रतीक ठरणारा दीपावली स्नेहमिलन सोहळा माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता, हा कार्यक्रम शुक्रवार (२४) रोजी सकाळी १०.०० ते दुपारी १.०० या वेळेत येथील भारती लॉन्स, बालाजी चौक, भोकरदन रोड येथे संपन्न झाला. यावेळी माजी मंत्री राजेश टोपे, माजी मंत्री आ. अर्जुनराव खोतकर, भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आ. नारायण कुचे, माजी आमदार कैलास गोरंट्याल माजी आमदार अरविंद चव्हाण, माजी आमदार संतोष सांबरे, भाजपा प्रदेश सचिव राहुल लोणीकर, सतीश घाटगे, घनश्याम गोयल, अशोक आण्णा पांगारकर, राजेश राऊत आदींची उपस्थिती होती.
यावेळी दीपावली स्नेह मिलन कार्यक्रम प्रसंगी शुभेच्छा देताना माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले की, मी १९९० ला पहिल्यांदा एकमेव काँग्रेसच्या राजवटीत भाजपचा आमदार झालो. तेव्हा पासून मी जिल्ह्याच्या विकास कामासाठी व अनुशेष भरून काढण्यासाठी प्रयत्न केले. १९९५ ला भाजपा युतीची सत्ता असताना जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक कामे मंजूर केले. २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार मध्ये मंत्री व भाजपाचा प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे केंद्र व राज्यशासनाच्या अनेक जनकल्याणकारी योजनेंचा फायदा जालना जिल्ह्यासाठी मिळवून दिला. यावेळी कैलास गोरंट्याल यांनी जालना जिल्ह्याचे माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांच्या पराभवामुळे जिल्ह्याच्या विकासाचे मोठे नुकसान झाले असल्याची भावना व्यक्त केली. रावसाहेब दानवे यांनी मंत्रिपदाच्या काळात जिल्ह्यासाठी अनेक विकासकामे केली.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकल्पांना गती मिळाली होती. त्यांच्या पराभवामुळे केंद्रातील प्रतिनिधित्व कमी झाले असून, त्याचा थेट परिणाम जिल्ह्याच्या विकासावर झाल्याचे ते म्हणाले.
यावेळी भास्कर दानवे यांनी जालना जिल्ह्यातील जनतेने नेहमीच दानवे परिवारावर अपार प्रेम आणि विश्वास दाखवला असुन जनतेचे प्रेम आणि पाठिंबा आमच्यासाठी सर्वांत मोठ बळ आहे. आम्ही हे प्रेम अधिक दृढ करुन जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्य करत राह असे सांगीतले.