

Jalnekar's Diwali in darkness
जालना, पुढारी वृत्तसेवाः जालना शहरात ऐन दिवाळीत महावितरणची वीज गुल झाल्याने प्रकाशाचा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवाळीचा सण जालनेकरांना अंधारात पार पाडावा लागला. महावितरणच्या गलथान कारभाराविरोधात नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया ऐकावयास मिळाल्या.
जालना शहरातील वीज पुरवठा मागील काही दिवसांपासून पूर्णपणे, कोलमडला आहे. मध्यंतरी आ. अर्जुनराव खोतकर यांनी वरिष्ठ मंत्र्यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत महावितरण विरोधात आरोपांच्या फैरी झाडत त्यांचा गलथान कारभार चव्हाट्यावर आणला होता. त्यानंतर मध्यंतरी काही दिवस कारभार सुधारला असे वाटत ऐन दिवाळीत असतानाच महावितरणचा वीज पुरवठा रात्री खंडित झाल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप सोसावा लागला.
अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या दीपावली सणातही महावितरणने प्रकाशाऐवजी जालनेकरांना पुन्हा अंधाराकडे नेले. वीज बिल वसुली व वीज चोरीबाबत अत्यंत 'जागृत असलेली महावितरणचे अधिकारी ग्राहकांना सेवा देण्यात मात्र कोसोदूर असल्याचे दिसत आहे. शहरात मागील अनेक दिवसांपासून महावितरण ग्राहकांना चांगली सेवा देण्यात कमी पडत असल्याने ग्राहक त्रस्त असल्याचे चित्र आहे.
वीज बीलात भरीव वाढ करीत असतांना सेवा देण्यात मात्र अधिकारी व कर्मचारी कमी पडत असल्याने महावितरणची वीज जालनेकरांसाठी असुन अडचण नसुन खोळंबा बनली आहे.