

Bhokardan Taluka Crop Damage
पारध: भोकरदन तालुक्यातील पारध परिसरात रविवारी (दि.२६) व सोमवारी (दि.२७) मध्यरात्री पुन्हा झालेल्या जोरदार पावसामुळे सोंगणी करून टाकलेल्या मका व सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून चिंतेत अडकलेला आहे.
गेल्या महिन्याभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे अक्षरशः झोडपून काढले. त्यामुळे तालुक्यातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सोमवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांची तारांबळ उडाली होती. जोरदार वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे पिके आडवी झाली आहेत.
पुढील 24 तासांत अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्यातून मान्सून गेला असला तरीही पुढील काही दिवस राज्यात पावसाचे ढग कायमच राहणार आहेत. ऑक्टोबरपर्यंत पाऊस असणार आहे, असे हवामान अंदाजानुसार वर्तविण्यात येत आहे.
शेतकऱ्यांच्या शेतीपिकांसह पशुधनाचही नुकसान झाले होते. त्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीने हिरावून घेतला होता. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकटात असताना आता पुन्हा एकदा पावसाने अडचणीत आणल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
दीड एकरात मका पीक आणि चिकूची बाग आहे. परंतु अवकाळी पावसामुळे हातचा आलेला घास हिरावून घेतला आहे. दोन वर्षांपूर्वी मी भारतीय स्टेट बँक कडून क्रॉप लोन घेतले होते. पण मागील आठ दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे आता उत्पन्नाची आशा मावळली आहे. बँक खात्यामध्ये 80 ते 90 हजार रुपये होते. पण बँकेने अकाउंट होल्ड करून टाकले आहे. त्यामुळे तालुका कृषी अधिकाऱ्यांनी त्वरीत पंचनामा करून त्वरित नुकसान भरपाई द्यावी,
- सतिश लोखंडे (शेतकरी)
मी यावर्षी शेतामध्ये सोयाबीनची लागवड केली होती. जवळपास एक एकर सोयाबीन पेरले होते. त्या जवळपास 15000 रुपये लागवडीचा खर्च झाला होता. सोयाबीनचे उत्पन्न हे चांगले होणार होते. पण मागील आठ दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे व रात्री पडलेल्या पावसामुळे सोयाबीन पीक पाण्याखाली गेले आहे. सोयाबीनला कोंब येऊ लागले आहेत. कृषी विभागाने त्वरित पंचनामा करून आम्हाला नुकसान भरपाई द्यावी
- तेजस देशमुख (शेतकरी)