

Families from 42 slums in Jalna city will get their rightful homes
जालना, पुढारी वृत्तसेवाः जालना शहरातील ४२ झोपडपट्टयांमधील रहिवासी असलेल्या हजारो कुटुंबांचे हक्काच्या घरांचे स्वप्न भाजपा नेत्यांच्या पाठपुराव्यामुळे साकार होणार आहे. नागपूर येथील सीएफएसडी या एजन्सीला सर्वेक्षणाचे कंत्राट मिळाले असून दीपावलीनंतर सर्वेक्षणाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार असल्याची माहिती जालन्याचे माजी आमदार तथा भाजपा नेते कैलास गोरंट्याल यांनी दिली.
जालना शहरातील ४२ झोपडपट्ट्यांमध्ये मागील अनेक वर्षांपासून वास्तव्य करत असलेल्या हजारो कुटुंबांना जागा व घरे नियमनाकुलीत करून त्यांना मालमत्ता पत्रक (पी.आर. कार्ड) द्यावे, अशी मागणी जालन्याचे माजी आमदार तथा भाजपा नेते कैलास गोरंट्याल यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली होती. भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, माजी मंत्री आ. बबनराव लोणीकर, आ. संतोष पाटील दानवे, भाजपा जिल्हाध्यक्ष आ. नारायण कुचे, जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्करराव पाटील दानवे यांच्यासह आपण स्वतः देखील या प्रकरणी सातत्याने पाठपुरावा करत हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले.
राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिलेल्या निवेदनावर सर्वेक्षणाचे निर्देश देत सदर निवेदन मागील सप्टेंबर महिन्यात जालन्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांना पाठवले होते. शिवाय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात या प्रश्नासंदर्भात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन झोपडपट्टी भागातील रहिवाशांचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले होते. गेल्या ४० ते ५० वर्षांपासून वास्तव्यास असूनही मालमत्ता पत्रक मिळाले नाही.
शहरातील झोपडपट्टी भागातील रहिवाशांच्या सर्वेक्षणाचे काम दीपावली नंतर हाती घेण्यात येणार आहे. या सर्वेक्षणानंतर झोपडपट्टी भागातील रहिवाशांचे हक्काच्या घरांचे स्वप्न साकार होणार असून घरकुल अनुदान मिळण्यासह अन्य शासकीय योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचे कैलाश गोरंट्याल म्हणाले.