

जालना : भटक्या कुत्र्यांनी लचके तोडल्यामुळे चिमुकलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडली आहे. ही घटना अंबड चौफुली परिसरातील यशवंतनगरमध्ये घडली. परी दीपक गोस्वामी (वय 3) असे मृत चिमुकलीचे नाव आहे. तालुका पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. या घटनेमुळे ऐन दिवाळीत गोस्वामी कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
जालना शहरातील यशवंतनगर या उच्चभ्रू कॉलनीत राहणार्या परी दीपक गोस्वामी ही चिमुकली सोमवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास अचानक झोपेतून उठली. परीचे वडील दीपक गोस्वामी हे बिहारचे असून, ते सोलर इंजिनिअर आहेत. परीची आई घरात नसल्याने तिने सोमवारी पहाटे वडील झोपेत असताना दरवाजा उघडून आईचा शोध घेण्यासाठी घराबाहेर पडली असता, मोकाट कुत्र्यांच्या झुंडीने एकट्या परीला घेरले आणि तिचे लचके तोडत शेजारी असलेल्या मोकळ्या प्लॉटवर नेले.
परी किंचाळत असताना परिसरातील कोणालाही जाग आली नाही. कुत्र्यांनी अक्षरशः तिच्या अंगाचे लचके तोडत तिचे अनेक अवयव फस्त केले. सोमवारी सकाळी मॉर्निंग वॉकवरून घरी परत येणारे पोलिस कर्मचारी मदन बहुरे यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी त्या रक्तपिपासू कुत्र्यांना हाकलून लावत पोलिसांना खबर दिली.