

Transportation of beef; rickshaw driver arrested
जालना, पुढारी वृत्तसेवाः बारवाले कॉलेजसमोर गोवंश मांसाची अवैध वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळताच, चंदनझिरा पोलिसांनी सापळा रचून एका रिक्षाचालकास ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी या कारवाईत २०९ न किलो गोवंश मांस आणि रिक्षा असा एकूण १ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
शनिवारी (दि. ११) सकाळी ९:०० वाजण्याच्या सुमारास चंदनझिरा पोलीस ठाण्यातील पथकाला गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, बारवाले कॉलेजमार्गे एका तीन चाकी रिक्षामध्ये गोवंश मांसाची वाहतूक केली जात आहे.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी बारवाले कॉलेजसमोर सापळा रचला. काही वेळाने संशयास्पद रिक्षा (क्रमांक एमएच२१, जी २१७९) येताना दिसताच पोलिसांनी ती थांबवली. रिक्षाची झडती घेतली असता, त्यात २०९ किलो गोवंश जातीच्या जनावराचे मांस आढळून आले. पोलिसांनी रिक्षाचालक नसिर गुलाम रसुल कुरेशी (५४, रा. मोरंडी मोहल्ला, जालना) याला ताब्यात घेतले.
चंदनझिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
याप्रकरणी उपनिरीक्षक सय्यद अफसर सय्यद अजगर हुसेन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, चंदनझिरा पोलीस ठाण्यात आरोपी नसिर कुरेशी याच्याविरुद्ध महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ च्या कलम ५ (क) आणि ९ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार शरद पवार करत आहेत.