Nanded Crime : गुंगीचे इंजेक्शन देऊन जनावरे चोरी; १७ आरोपींवर गुन्हे

एलसीबीची कामगिरी : १५.६३ लाखांचा मुद्देमाल जप्त; १४ गुन्हे उघड
Nanded Crime News
गुंगीचे इंजेक्शन देऊन जनावरे चोरी; १७ आरोपींवर गुन्हे pudhari photo
Published on
Updated on

नांदेड : गोवंशीय जनावरांना गुंगीचे औषध व इंजेक्शन देऊन, त्यांची थेट आलिशान इनोव्हा कारमधून तस्करी करणाऱ्या एका मोठ्या आंतरराज्य टोळीचा छडा लावण्यात नांदेड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण १७ आरोपींवर गुन्हे दाखल केले असून, नांदेड जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांतील जनावरे चोरीचे १४ गुन्हे उघडकीस आणले आहेत.

आरोपींकडून टोयोटा इनोव्हा कार, रोकड आणि गुंगीच्या औषधांसह एकूण १५ लाख ६३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ​जिल्ह्यात पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेगारांविरुद्ध ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ मोहीम राबवली जात आहे.

Nanded Crime News
Beed Crime : आष्टीत ‘धूम स्टाईल’ सोनसाखळी चोरांचा पर्दाफाश; दोन सख्खे मेहुणे गजाआड

यादरम्यान एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक महेश कोरे व त्यांचे पथक २२ जून रोजी नांदेड शहरात पेट्रोलिंग करत असताना, त्यांना वाजेगाव येथील वाहेद कॉलनी परिसरात गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर जनावरे चोरणारी टोळी भाड्याच्या घरात राहत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या सूचनेवरून पथकाने दुपारी ४.१५ वाजता सदर घरावर छापा टाकला.

कार आणि बनावट नंबर प्लेटचा वापर

​पोलिसांनी घटनास्थळावरून अजीम रौफ गाझी (वय ३१, रा. बैलबाजार, कल्याण, जि. ठाणे) आणि सय्यद समीर उर्फ बाबू सय्यद समी अहमद (वय २३, रा. लेबर कॉलनी, नांदेड) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी इतर १५ साथीदारांच्या मदतीने जिल्ह्यातील विविध भागात चोऱ्या केल्याची कबुली दिली.

ही टोळी फिरताना जनावरांना गुंगीचे इंजेक्शन देऊन बेशुद्ध करायची आणि त्यानंतर त्यांना इनोव्हा कारमध्ये (क्र. एम एच-०२-एपी ७००८) कोंबून त्यांची वाहतूक व विक्री करायची. पोलिसांना संशय येऊ नये म्हणून गाडीवर बनावट नंबर प्लेट्स वापरल्या जात होत्या अशी माहिती समोर आली आहे.

Nanded Crime News
Washim Crime : मंगरुळपीर हादरले! १९ लाखांचा गांजा जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

५ आरोपी तेलंगणा पोलिसांच्या ताब्यात

​या गुन्ह्यातील एकूण १७ आरोपींपैकी ५ आरोपींना (आलम अनिस शेख, तब्बस शकील शेख, फर्मान साबीर शेख, साहेब कादरी, वसिम जमील शेख - सर्व रा. कल्याण,मुंबई परिसर) नांदेड व तेलंगणाच्या आदिलाबाद पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अटक केली आहे. सध्या ते आदिलाबाद टाऊन-२ पोलिसांच्या ताब्यात असून, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नांदेड पोलीस त्यांना ताब्यात घेणार आहेत. या गुन्ह्यातील उर्वरित १० आरोपी सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

​'या' ठाण्यांमधील गुन्हे उघड

​पकडण्यात आलेल्या आरोपींच्या चौकशीतून अर्धापूर, लिंबगाव (२ गुन्हे), मनाठा, उमरी, कंधार, उस्मानगर, मरखेल, किनवट, मुक्रमाबाद, मांडवी, बिलोली आणि भाग्यनगर या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण १४ गुन्हे उघड झाले आहेत. हे सर्व गुन्हे भारतीय न्याय संहिता-२०२३ च्या कलम ३०३ (२) आणि ३ (५) अन्वये दाखल आहेत. पुढील कारवाईसाठी मुख्य आरोपींना अर्धापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

​​कारवाई करणारे पथक

ही यशस्वी कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले, पीएसआय महेश कोरे, पीएसआय इरफान सय्यद, बळीराम दासरे, माधव केंद्रे तसेच अंमलदार सुनील गटलेवार, ज्ञानोबा कवठेकर, शेख उमर, श्रीराम दासरे, मोतीराम पवार, संघरत्न गायकवाड आणि सायबर सेलच्या पथकाने केली आहे. पोलीस अधीक्षकांनी या कामगिरीबद्दल पथकाचे कौतुक केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news