

Tractors Grounded in Paradh Farmlands Due to Diesel Shortage
पारध, पुढारी वृत्तसेवा: भोकरदन तालुक्यातील पारध, पिंपळगाव रेणुकाई व वालसावांगी परिसरात सध्या डिझेल टंचाईमुळे अक्षरशः युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पेट्रोल पंपांवर तब्बल एक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या असून अनेक ठिकाणी डिझेल पूर्णतः संपल्याने शेतकरी व ट्रॅक्टर मालक मोठ्या संकटात सापडले आहेत.
उन्हाळ्याच्या तोंडावर शेतीची मशागत जोरात सुरू आहे. कुणाचे गहू काढणी, कुणाचे मळणी यंत्र, तर कुणाचे रोटावेटर व नागाटीची कामे सुरू आहेत. या सर्व कामांसाठी डिझेल अत्यावश्यक असल्याने अचानक निर्माण झालेल्या टंचाईने शेती कामांवर मोठा परिणाम झाला आहे. डिझेल मिळवण्यासाठी शेतकरी व वाहनध-ारकांना रात्री उशिरापर्यंत ३० ते ४० किलोमीटर अंतरावर जाऊन, बुलढाणा, चिखली किंवा भोकरदन येथे तासन्तास रांगेत थांबावे लागत आहे. काहींना ३ ते ४ तास प्रतीक्षा करूनही डिझेल मिळत नसल्याची परिस्थिती आहे.
दरम्यान, ही परिस्थिती केवळ शेतीपुरती मर्यादित नसून आरोग्य व्यवस्थेलाही फटका बसत आहे. रुग्णवाहिका व खासगी वाहनांना डिझेलसाठी १-२ तास रांगेत थांबावे लागत असल्याने रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यात अडथळे येत आहेत.
पारध, पिंपळगाव व वालसावांगी परिसरात सध्या मिरची लागवडीचा हंगाम सुरू होणार आहे. अशा वेळी ही टंचाई कायम राहिल्यास उत्पादनावर रविराज तसेच बाजारपेठेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पिंपळगाव मार्केट सुरळीत सुरू राहणेही अत्यंत गरजेचे असल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे.
सध्या निर्माण झालेली ही डिझेल टंचाई केवळ एक तात्पुरती अडचण नसून ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी गंभीर इशारा आहे. प्रशासनाने त्वरित हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणणे गरजेचे असून, अन्यथा येणाऱ्या काळात शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागू शकते. जिल पुरवठा विभागाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.