

पिशोर : पिशोर आणि नाचनवेल परिसरातील पेट्रोल पंपांवर सध्या इंधनासाठी वाहनधारकांच्या लांबलचक रांगा पाहायला मिळत आहेत. इंधन टंचाईच्या केवळ अफवेनेही नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, याचा सर्वाधिक फटका शेती मशागतीची कामे करणाऱ्या शेतकऱ्यांना बसत आहे.
पेट्रोल-डिझेल संपण्याच्या भीतीने अनेकांनी टाक्या फुल्ल करून घेतल्यामुळे गुरुवारी सकाळी १० वाजेपर्यंतच अनेक पंपांवरील साठा संपला होता. परिणामी, वाहनधारकांना रिकाम्या हाती परतावे लागले.
सध्या शेती मशागतीचे दिवस जोरात सुरू आहेत. मात्र, ट्रॅक्टर आणि इतर यंत्रसामग्रीसाठी डिझेल उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांची मोठी कोंडी झाली आहे. "कडक उन्हात तासन्तास रांगेत उभे राहूनही इंधन मिळेल की नाही याची शाश्वती नाही. मग आम्ही शेतीची कामे कधी करायची?" असा संतप्त सवाल शेतकरी विचारत आहेत.
आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम झाल्याची चर्चा नागरिक करत आहेत, मात्र प्रशासनाकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही. तात्काळ हस्तक्षेपाची मागणी यापूर्वीही अशा परिस्थितीत प्रशासनाने पुढाकार घेऊन पुरवठा सुरळीत केला होता. आताही शेतीची कामे ठप्प होऊ नयेत म्हणून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा आणि अफवांना आळा घालून इंधन पुरवठा पूर्ववत करावा, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.