

Torrential rain damage in Murtad, twenty acres of crops under water
संदीप देशमुख
पिंपळगाव रेणुकाई : भोकरदन तालुक्यातील मुर्तड येथे मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास पडलेल्या ढगफुटीसदृश पडलेल्या पावसामुळे वीस एकरांवरील खरिपाची पिके पाण्याखाली गेली. पावसामुळे मिरची, सोयाबीन, कापूस व मका पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
भोकरदन तालुक्यातील मुर्तड येथे मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ढगफुटीसदृश पाऊस पडल्याने वीस एकर शेतामध्ये पाणी साचल्यामुळे कापूस, सोयाबीन, मका, मिरची आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पावसामुळे अनेक शेतांना तळ्याचे स्वरुप आले होते. अनेक शेत रस्त्यावरून धो-धो पाणी वाहिले. गावातील ओढनाले पावसामुळे भरून वाहिले. पावसामुळे विनायक सोनुने याच्या शेतातील एक एकरवरील मिरची पिकात पाणी साचल्याने त्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागला.
मिरचीला सध्या आठ हजार ते नऊ हजार रुपये क्विंटलचा भाव आहे. मिरची पिकात पाणी साचल्याने मिरचीच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानी भरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे.
भोकरदन तालुक्यात काही भागात धो-धो पाऊस पडत असतानाच काही भागात अद्यापही पुरेसा पाऊस पडलेला नसल्याने खरिपाची पिके पाण्यावर आहेत. तालुक्यात कुठे अतिवृष्टी तर कुठे पावसाची प्रतीक्षा अशी विचित्र स्थिती पहावयास मिळत आहे. पावसाच्या या लहरीपणाचा तोटा शेतकऱ्यांना होताना दिसत आहे.