

Good prices for safflower, sunflower
जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना मोंढ्यात करडई व सूर्यफूलाला चांगली मागणी होत असून भावही चांगले मिळत आहे. करडीईचे भाव ७ हजार ८०० ते ८००० रुपये तर सूर्यफूलाला ४ हजारांपासून ५ हजारांपर्यंत प्रतिक्विंटलचे भाव मिळत आहेत. जालना जिल्ह्यात करडईची आवक नगण्य होत असल्याने कर्नाटकातून करडई मागविली जात आहे.
जालना मोंढ्यात करडईला चांगली मागणी होत असली तरी जिल्ह्यातून आवक एक अंकी आहे. करडई चे भाव वाढण्याचे कारण नोकरदार वर्ग हा करडई तेलाकडे वळला आहे. या तेलाला चांगली मागणी होत असतानाच करडईची आवक कमी होत असल्याने कर्नाटकातून करडई आयात केली जात आहे.
जालना मोंढ्यात ७८०० ते ८००० रुपयांचे भाव करडईला मिळत असल्याची माहिती अडत व्यापारी संजय कानडे यांनी दिली. मागील दोन वर्षांपासून सूर्यफूल तेल कारखानदारांकडून सूर्यफुलाला चांगली मागणी होत आहे. सूर्यफूलाचे भाव ४००० ते ४५००, मध्यम सूर्यफूल ४५०० ते ४८००, उत्तम व दर्जेदार सूर्यफूल ४८०० ते ५००० प्रतिक्विंटल असल्याची अडत व्यापारी माधवराव पाटील इंगळे यांनी दिली.
जालना मॉढ्यात सध्या तुरीच्या भावात मंदी आहे. तूर उत्पादनात यंदा लक्षणीय वाढ झाली आहे. तुरीची आवक दररोज ८०० ते १००० पोत्यांची होत आहे. तुरीचे भाव सध्या ६ हजार ते ७ हजार रुपये प्रतिक्विंटल आहेत. त्यात वाढ होण्याची आशा शेतकऱ्यांना आहे.
यंदा ज्वारीचा पेरा कमी असतानाच मागणी वाढल्याने ज्वारीला चांगले भाव मिळत आहेत. ज्वारी सोंगणीच्या वेळेस पाऊस पडल्याने ज्वारीचा दर्जा घसरला आहे. त्यामुळे भावात तफावत आहे. चांगल्या ज्वारीला पुणे, नाशिक, मुंबई व नगर येथून मागणी होत आहे. तर हलक्या ज्वारीला गुजरातकडून मागणी होत आहे. ज्वारीचे भाव वाढण्याची शक्यता आहे.
फ्लोअर मिल गव्हाचे भाव वाढले जालना मोंढ्यात फ्लोअर मिल गव्हाला चांगली मागणी होत असल्याने भाव चांगले मिळत आहेत. गव्हाची आवक दररोज ७००ते ८०० पोत्यांची होत आहे. शहरी भागातून मशीन क्लिन गव्हाला अधिक मागणी होत आहे. ग्रामीण भागातून शेतकरी गव्हाला मागणी आहे. त्यामुळे चांगले भाव मिळत आहे. गव्हाचे भाव २५०० ते २५५०, मध्यम २५५०ते २६००, बेस्ट गहू २६०० ते २७००रुपये.