

Tomato crop loss Rs. 2 lakhs
परतूर, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात अतिवृष्टीने थैमान घातले असून, अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याच मालिकेतील एक हृदयद्रावक घटना दैठणा खुर्द शिवारात घडली आहे. येथील गट नंबर २०६ मधील शेतकरी पार्वतीबाई ताठे यांच्या शेतात अतिवृष्टीच्या पाण्यामुळे टोमॅटोचे संपूर्ण पीक जळून गेले आहे.
श्रीमती ताठे यांनी मोठ्या कष्टाने आणि मेहनतीने आपल्या एक एकर शेतीत टोमॅटोचे पीक उभे केले होते. पीक काढणीच्या तोंडावर असतानाच, झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतात पाणी साचले आणि संपूर्ण पीक जळून पूर्णपणे नष्ट झाले. या नुकसानीत त्यांचे अंदाजे दोन लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
या अनपेक्षित आपत्तीमुळे शेतकरी महिला श्रीमती ताठे पूर्णपणे हतबल झाल्या आहेत. निसर्गाच्या या अवकृपेमुळे त्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. श्रीमती ताठे यांनी प्रशासनाकडे तातडीने पंचनामा करून या नुकसानीची दखल घेण्याची आणि लवकरात लवकर आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
अतिवृष्टीमुळे झालेले मोठे नुकसान लक्षात घेऊन शासनाने या शेतकरी महिलेला दिलासा देण्यासाठी प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन या नुकसानग्रस्त शेतकरी कुटुंबाला आर्थिक मदत देऊन आधार द्यावा अशी मागणी केली आहे. अतिवृष्टीमुळे गावातील सर्वच शेतकरी यांचे नुकसान झाले आहे.