

Jalna Heavy Rain Crops submerged, houses collapsed, 12 animals injured
जालना, पुढारी वृत्तसेवाः जिल्ह्यात शनिवारी रात्री पडलेल्या जोरदार पावसामुळे खरीप पिकांसह घरे व दुकानात पाणी शिरल्याने शेतकरी, व्यापारी व नागरीकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात भोकरदन तालुक्यातील ८ मंडळात, जाफराबाद १, जालना ३, अंबड ४, बदनापुर २, घनसावंगी ७ तर मंठा तालुक्यातील एका मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. भोकरदन शहरात अनेक दुकानात पाणी शिरले असुन रस्त्यांवरही मोठया प्रमाणात पाणी साचले आहे. पावसाच्या बाबतीत शेतकरी, व्यापारी व सर्व सामान्यांची परिस्थीती अति झाले अन रडु आले अशी झाली आहे.
जालना शहरात रेडअलर्टच्या पार्श्वभुमीवर प्रशासनाच्यावतीने जय्यत तयारी करण्यात आली होती. शनिवारी गावात ध्वनीक्षेपकांवर नागरीकांना काळजी घेण्याचे अवाहन करण्यात आले असतांनाच नदी काठावर राहणाऱ्या नागर-कांसाठी जुना जालन्यातील मुक्तेश्वर सभागृहात १५०, सर उर्दू हायस्कुल २५, आरएचव्ही शाळेत ५० नागरीकांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
या नागरीकांसाठी अन्नामृतसह इतर सेवाभावी संस्थाच्यावतीने जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. फुलंब्रीकर नाट्यगृह व जमनानगर हॉल येथेही नागरीकांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली असली तरी शनिवारी रात्री पर्यंत तेथे कोणीही राहण्यासाठी आले नव्हते. जालना तालुक्यातील बठाण, भाटेपुरी व पिंपळवाडी येथे दोन म्हैस व १ बैल विज पडुन ठार झाला. जिल्ह्यात मागील २४ तासात १२ जनावरे जखमी झाले आहेत.
भोकरदन तालुक्यात चोवीस तासात तब्बल १६५ मीमी पावसाची नोंद झाली आहे. भोकरदन तालुक्यात सिपोरा १०१, धावडा ७५, आन्वा १०६, पिंपळगाव रेणुकाई ११५, हसनाबाद १०३, राजुर ६६, केदारखेडा ७५ मीमी पावसाची नोंद झाली आहे.
भय इथले संपत नाही
जिल्ह्यातील ६७ पैकी ४८ तलाव ओव्हर फ्लो झाले आहेत. हवामान विभागाच्यावतीने २९ रोजी पुन्हा यलो अलर्ट जारी करण्यात आल्याने भय इथले संपत नाही अशी परिस्थती पावसाची झाली आहे. ग्रामीण भागात जिकडे पहावे तिकडे पाणीच पाणी दिसत आहे. शेतांचे तळे झाले असुन अनेक ठिकाणी बांधही उध्वस्त झाले आहेत.