

Ten thousand people from Jalna moved to safer places
जालना / शहागड : पुढारी वृत्तसेवा : जायकवाडी स्थळी विसर्गामुळे जालना जिल्ह्यात सुमारे १०,००० लोकांना विविध गावांतून सुरक्षित हलविण्यात आले असून, यातील ६, ८७० नागरिकांना जिल्हा परिषद शाळा आणि विविध समाजमंदिरात केलेल्या व्यवस्थेत ठेवण्यात आले आहे.
परतूर, अंबड, घनसावंगी येथील हे नागरिक आहेत. त्यांना भोजन आणि सर्व सुविधा पुरविण्यात येत आहेत. २३ ठिकाणी अशा निवासव्यवस्था करण्यात आल्या आहेत. अनेक शेतकर्यांच्या पशुधनालाही सुरक्षित स्थळी हलवून त्यांना चारा देण्यात येत आहे, असे सांगण्यात आले.
दरम्यान, शहागडमधील पूरस्थितीवर प्रशासनाचे लक्ष असून, एनडी आरएफ ची एक टीम दाखल झाली आहे. तीन ठिकाणी स्थलांतरित कुटुंबासाठी राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
गोदावरीमुळे पैठण, अंबड, गेवराई तालुक्यातील ६० गावांना पुराचा वेढा पडू शकतो. पूर पाहण्यासाठी नागरिक गर्दी करीत असून, सहाय्यक फौजदार ज्ञानेश्वर कंटुले यांनी नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. शहागडचा जुना पुल तसेच हिंदू स्मशान भूमी पाण्याखाली आली आहे.