

The water supply scheme should be inspected by a third-party organization, and any deficiencies should be rectified
जालना, पुढारी वृत्तसेवाः जिल्ह्यात जल जीवन मिशन अंतर्गत मंजूर अस-लेली ग्रामीण पाणीपुरवठ्याची कामे वेळेत आणि गुणवत्तापूर्ण होणे गरजेचे - आहे. जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनांच्या कामांची टाटा कन्सलटन्सी या त्रयस्थ संस्थेकडून तांत्रिक तपासणी करण्यात येत असून अहवालानुसार प्राप्त झालेल्या त्रुटीची पूर्तता तातडीने करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हास्तरावर स्थापन केलेल्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनची बैठक पार पडली. या प्रसंगी त्या बोलत होत्या. या बैठकीस कार्यकारी अभियंता सर्जेराव शिंदे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अभियंता श्री. पाध्ये, उप अभियंता बोडखे, जवंजाळ, ठाकुर, स्वच्छता तज्ञ नम्रता गोस्वामी, उप कार्यकारी अभियंता पुजा बुलबुले, घोरपडे यांच्यासह संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यातील अंबड, बदनापूर, भोकरदन, घनसावंगी, जाफ्राबाद आणि जालना या तालूक्यासाठी जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेची कामे मंजूर झालेली आहे. तर उर्वरीत १२० व ७० गावांसाठी परतूर व मंठा तालुक्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यंत्रणेद्वारे २ ग्रीड पाणी पुरवठा योजना राबविण्यात येत आहेत. कंत्राटदारानेही गुणवत्तेचे काम करणे आवश्यक असून योजनेतील निकषानूसार शाखा अभियंत्यांनी प्रत्यक्ष हजर राहत कामे काळजीपुर्वक करावी. कामात कसूर केल्यास हयगय केली जाणार नाही.
या कामात समावेश असलेल्या उपअभियंता यांनी केवळ कागदोपत्री कामे न करता आठवडाभरात किमान ४ वेळा क्षेत्रभेट देऊन कामाची तपासणी करावी. आपणही विविध तालुक्यांतील कामांना भेटी देऊन पाहणी करणार आहे. तरी प्रत्येक कामांचे जिओ टॅगिंग छायाचित्र व व्हिडीओ अहवालासोबत सादर करावेत. दिलेल्या उद्दिष्टानुसार काम न केलेल्या अभियंता आणि कंत्राटदारविरुध्द कारवाई प्रस्तावित करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले आहेत. पाणीपुरवठा विभागामार्फत सद्यस्थितीत सुरू असलेल्या कामाबाबत माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी यावेळी दिली.