

Fenugreek prices have crashed.
पिंपळगाव रेणुकाई, पुढारी वृत्तसेवाः भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई परिसरात मेथीच्या मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. यंदा मेथीचे पिकही जोमात आले असतांनाच मेथीला भावच नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. पिंपळगाव रेणुकाई येथील एका शेतकऱ्याने व्यापाऱ्याला भाव नसल्याने फुकट मेथी देउन टाकली आहे.
भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई परिसरात शेतकऱ्यांनी झटपट येणाऱ्या मेथी या भाजी पिकाची लागवड केली. गेल्या महिन्यात मेथीला चांगला भाव मिळत होता. मात्र मेथीचे भाव अचानक को-सळले असुन आज शंभर रुपये प्रति क्विंटलही मेथी कोणी घेत नसल्याने शेतकऱ्यांना याचा आर्थिक फटका बसत आहे.
भाज्यांना चांगला भाव मिळेल या आशेवर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मेथी व इतर भाजीपाल्याची लागवड केली आहे. परंतु पिकाला भाव नसल्याने शेतकऱ्यांनी केलेला खर्चही निघत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. पिंपळगाव रेणुकाई येथे शेतकऱ्याने शेतातुन तोडुन मेथी विक्रीसाठी आणली. मात्र ती विकत घेण्यास कोणीच पुढे येत नसल्याने शेतकऱ्याने मेथी परत नेण्यापेक्षा ती व्यापाऱ्याला फुकट देउन तो निघुन गेला.