

The stock of domestic gas is sufficient for only three days
जालना, पुढारी वृत्तसेवा : इस्रायल - अमेरिका आणि इराण यांच्यात घमासान युध्द सुरू आहे. या युध्दाची झळ जालना शहरासह जिल्ह्याला जाणवू लागली आहे. सध्या घरगुती गॅसचा साठा केवळ तीन दिवसांचाच उपलब्ध आहे. तर व्यावसायिक सिलिंडर पुरवठा प्रशासनाच्यावतीने तात्पुरता बंद करण्यात आला आहे. यामुळे हॉटेल व्यावसायिकांना कोंडीला सामोरे जावे लागणार आहे.
दरम्यान, गुरुवार दि. १२ रोजी दुपारनंतर बहुतांश गॅस एजन्सीधारकांकडील घरगुती गॅसचा साठा संपलेला होता. मात्र, गॅसधारकांची गर्दी काही कमी झाली नव्हती. शहरवासीयांना बुकिंगवर समाधान मानावे लागले. शहरात घरगुती गॅसची टंचाई संभ्रमाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी जालन्यात गॅस एजन्सीधारकांची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.
गेल्या काही दिवसांत गॅस उपलब्ध नसल्याच्या चर्चेमुळे शहरातील विविध गॅस एजन्सींवर ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती. बुकिंग होत नसल्याने अनेक ग्राहक त्रस्त झाले होते. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने एजन्सी धारकांसोबत बैठक घेतली.
बैठकीत सध्या व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा तात्पुरता बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र रुग्णालये, वसतिगृहे तसेच अत्यावश्यक सेवा देणाऱ्या संस्थांना गॅस पुरवठा सुरू ठेवण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. प्रशासनाच्या माहितीनुसार सध्या गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून परिस्थिती नियंत्रणात आहे. त्यामुळे नागरिकांनी संयम राखत नियमित प्रक्रियेनुसारच गॅस बुकिंग करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांनी घाईगडबड करू नये
गॅस एजन्सी संघटनेचे अध्यक्ष आनंद देशमुख यांनीही माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, काही वृत्तवाहिन्यांवर गॅस पुरवठा बंद झाल्याच्या बातम्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रत्यक्षात घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू असून नागरिकांनी घाईगडबड करू नये, असे त्यांनी स्पष्ट केले.