

The security of ATMs in the district is being neglected.
जालना, पुढारी वृत्तसेवा : येथील भोकरदन नाका परिसरातील भारतीय स्टेट बँकेच्या एटीएमची सध्या दुरवस्था झाली आहे. एटीएम केबिनचा दरवाजा तुटल्याने एटीएमची सुरक्षा वाऱ्यावर आहे. त्यामुळे या दरवाजाची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
राष्ट्रीयीकृत बँकांसह खासगी, सहकारी तत्त्वावर चलणाऱ्या बँका, पतसंस्था तसेच अनेक फायनान्स कंपन्यांच्या शाखा जालना शहरासह जिल्ह्यात आहेत. या शाखांमध्ये दररोज लाखो रुपयांचे व्यवहार होतात. तसेच ग्राहकांच्या सोयीसाठी विविध बँकांनी ठिकठिकाणी एटीएम सेंटर सुरू केली आहेत. एटीएमच्या माध्यमातून ग्राहकांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्नही बँकांकडून सुरू आहे.
एखाद्या मशीनला तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास काही वेळातच बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून त्याची दुरुस्ती केली जाते. वारंवार एटीएम मशीनमध्ये पैशाचा भरणाही केला जातो. पैशाचा भरणा करताना व मशीनची दुरुस्ती करताना काहीवेळ एटीएम सेंटरचा दरवाजा बंद करण्यात येतो. सुरक्षेच्या दृष्टीने केली जाणारी ही तात्पुरती उपाययोजना आहे. मात्र, कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत बँका निरुत्साही आहेत.
सीसीटीव्ही कॅमेरेही नावालाच
एटीएम सेंटरमध्ये सीसीटीव्ही असतात. मात्र, काही सेंटरवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही दुरवस्था झाल्याचे दिसून येते. ठिकठिकाणी मोडतोड होऊन कॅमेरे लोंबकळत असल्याचे दिसते. तर काही ठिकाणी कॅमेऱ्यांवर धूळ साचल्याचे पहायला मिळते. या परिस्थितीत सीसीटीव्हीद्वारे चित्रण कसे होणार, हासुद्धा प्रश्न आहे.
देखरेख करायची कुणी?
एटीएम सेंटरना रखवालदार नाहीत. त्यामुळे कधीही आणि कुणीही एटीएममध्ये प्रवेश करू शकतो, अशी परिस्थिती आहे. हटकणारे कुणीही नसल्यामुळे काही वेळा एटीएमच्या परिसरात काही जण तासन्तास विश्रांती घेतात. किमान रात्रीच्या वेळी त्याठिकाणी रखवालदार नेमणे गरजेचे असताना बँका त्याकडे गांभीर्याने पाहत नाहीत.