

One hundred and fifty children of sugarcane cutters have rejoined the education system.
जालना, पुढारी वृत्तसेवा: हंगामी स्थलांतर करणाऱ्या उसतोड कामगारांच्या मानसिक, सामाजिक व कौटुंबिक समस्या लक्षात घेऊन त्यांना आरोग्य, पोषण व शिक्षणाबाबत मार्गदर्शन व आधार मिळावा, या उद्देशाने समूपदेशन करण्यात आले. यातून सुमारे २५० मुलांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम झाले आहे.
मराठवाडा ग्रामीण विकास संस्था, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने ऊसतोड कामगारांसाठी उपक्रम राबविण्यात येत आहे. या समूपदेशन कार्यक्रमात उसतोड कामगारांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कामाच्या ताणतणावामुळे निर्माण होणाऱ्या मानसिक अडचणी, कुटुंबापासून दूर राहण्याची वेदना, आर्थिक समस्या, व्यसनाधीनता, आरोग्य व पोषण शिक्षणासंबंधी अडचणी तसेच मुलांच्या शिक्षणाबाबतच्या चिंता या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.
या उपक्रमासाठी अप्पासाहेब उगले, प्रकल्प संचालक, भाऊसाहेब गुजाळ, जिल्हा संपर्क अधिकारी, अश्वजित जाधव, प्रकल्प व्यवस्थापक यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा समन्वयक एकनाथ राऊत, राजेश वाघमारे, सुरेखा वाघमारे, दुर्गा नाडे, आकाश चैगुलै, महादेव खरात आदी परिश्रम घेत आहे.
कामगारांच्या समस्या घेतल्या जाणून
तज्ज्ञ समुपदेशकांनी संवादात्मक पद्धतीने कामगारांचे प्रश्न ऐकून घेत सकारात्मक विचारसरणी, तणाव व्यवस्थापन, कौटुंबिक संवाद, व्यसनमुक्ती व आरोग्याची काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. समूह चर्चेमुळे कामगारांना एकमेकांचे अनुभव ऐकण्याची व मनमोकळेपणाने संवाद साधण्याची संधी मिळाली.