

Loan waivers have been granted; so why are farmers' accounts on hold?
भोकरदन, पुढारी वृत्तसेवाः शासनाकडून पीककर्ज माफीचा लाभ मिळाल्यानंतरही भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया, पारध शाखेतील अनेक शेतकऱ्यांची बचत खाती अद्याप होल्ड असल्याने शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशांवरच निर्बंध कायम असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. खात्यांमध्ये शासकीय अनुदान व मदतीच्या रकमांचा भरणा होत असतानाही त्या रकमांचा वापर करता येत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. या प्रश्नावर आज बँक प्रशासनाला निवेदन देत शेतकऱ्यांची होल्ड असलेली बचत खाती तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली.
शासनाकडून दुष्काळी मदत, अनुदान आणि इतर लाभांच्या रकमांची वितरण प्रक्रिया सुरू असताना खात्यांवर होल्ड असल्यामुळे शेतकऱ्यांना स्वतःच्या पैशांसाठीही बँकेच्या निर्बंधांचा सामना करावा लागत आहे. शेतीच्या खर्चासाठी, घरगुती गरजांसाठी तसेच दैनंदिन व्यवहारांसाठी पैशांची आवश्यकता असताना खात्यांवरील अडथळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी वाढवणारे ठरत आहेत.
पीककर्ज माफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यांची तातडीने पडताळणी करून बचत खात्यांवरील होल्ड हटविण्यात यावा, बँक व्यवहार पूर्ववत सुरू करण्यात यावेत आणि शासनाकडून जमा होणाऱ्या अनुदान व मदतीच्या रकमांचा शेतकऱ्यांना विनाअडथळा वापर करता यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
यावेळी आंबेडकरवादी पँथर संघटनेचे सिद्धार्थ सुरडकर, पत्रकार रामसिंग ठाकूर, प्रशांत सुरडकर, दिलीप दांडगे, आकाश बोर्डे, विवेक सुरडकर, स्वप्नील सुरडकर, रामेश्वर मोरे यांच्यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.