

Jalna electricity Collector's office interrupted, the work stop
जालना, पुढारी वृत्तसेवा :
जालना शहरात गुरुवारी सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील झाडाची फांदी तुटून विजेच्या खांबावर पडल्याने वीज खांब को-सळून गुरुवारी सायंकाळी सहा वाजेपासुन खंडित झालेला वीज पुरवठा शुक्रवारी दिवसभर सुरुळीत झाला नव्हता. वीजपुरवठा खंडित झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांतील कामे ठप्प झाली होती. मोबाईलची बॅटरी लावून काही विभागांत कर्मचारी बसलेले दिसून आले.
जालना शहरात गुरुवारी सायंकाळ साडेपाच वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. अवघ्या अर्ध्यातास पडलेल्या या पावसामुळे अनेक भागांत पाणी साचले. शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी झाडे पडले. तर काही ठिकाणी होर्डिंग्ज व जाहिरात फलक कोसळले. वादळी वारा व पावसामुळे शहरातील वीजपुरवठा काही काळ खंडित झाला. काही भागात रात्री उशीरापर्यंत वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागला.
जालना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या झाडाची फांदी विजेच्या खांबावर कोसळल्याने विजेचा खांब गुरुवारच्या वादळात वाकला. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाचा वीजपुरवठा गुरुवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास खंडित झाला. त्यानंतर शुक्रवारी दिवसभर कार्यालयात वीजपुरवठा नसल्याने अनेक विभागातील कामे ठप्प झाल्याचे पहावयास मिळाले.
जिल्हाधिकारी कार्यालयाचा वीजपुरवठा बंद असल्याने बाहेरगावाहून कामासाठी आलेल्या अनेक नागरिकांना हात हलवित परत जावे लागले. शुक्रवारी दुपारनंतर कोसळलेला विजेचा खांब उभा करून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू झाले होते. दरम्यान सायंकाळपर्यंत वीज पुरवठा सुरळीत झाला नव्हता अशी माहिती सूत्रांनी दिली. वीजपुरवठा नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाचे कामकाज ठप्प होते.
जालना जिल्हाधिकारी कार्यालयास उच्चदाब विजेचे कनेक्शन देण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यासाठी स्वतंत्र पोल उभारण्यात आला असून ते काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. महावितरण व सार्वजनिक बांधकाम यांच्यातील समन्वयाच्या आभावामुळे वीज पुरवठा सुरळीत होण्यास विलंब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.