

The chili leaves withered due to the intensity of the heat
पिंपळगाव रेणुकाई, पुढारी वृत्तसेवा पिंपळगाव रेणुकाई, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई व परिसरात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा ४१ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. कडक उन्हामुळे नव्याने लागवड केलेल्या मिरचीच्या कवळ्या रोपांची पाने कोमेजून जाऊ लागली आहेत.
पिंपळगाव रेणुकाई परिसरात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मिरचीची लागवड केली आहे. ठिबक सिंचन आणि मल्चिंग पेपरच्या साहाय्याने केलेल्या लागवडीतून चांगल्या उत्पादनाची अपेक्षा होती. मात्र, अचानक वाढलेल्या उष्णतेमुळे मिरचीची रोपे सुकू लागली आहेत. सकाळी ११ नंतर शेतात काम करणेही अशक्य झाले असून, उष्णतेचा फटका थेट पिकाला बसत आहे.
शेतकऱ्यांनी सांगितले की, पाणी पुरेसे नाही जमिनीतील ओलावा वेगाने कमी होत आहे. त्यामुळे दररोज ठिबकद्वारे पाणी द्यावे लागत आहे, तरीही रोपांची वाढ खुंटल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी रोपे पूर्णपणे करपण्याच्या मार्गावर आहेत. तसेच पिकावर सततच्या उष्णतेमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लागवडीपासून ते आजपर्यंत केलेला खर्च वाया जाण्याची शक्यता आहे.