

जालना : दुष्काळी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रयोगाशिलतेने आता नवी दिशा पकडली आहे. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्माच्या माध्यमातून कमी पाण्यात आणि कमी खर्चात भरघोस उत्पन्न देणाऱ्या चिया पिकाची जिल्ह्यात सुमारे 865 एकरांवर लागवड झाली असून, यातून शेतकरी लाखांचा नफा कमावत आहेत.
जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात चिया पिकाला पसंती दिली. या पिकाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याला वन्यप्राण्यांचा त्रास होत नाही आणि कीड-रोगांचा प्रादुर्भावही अत्यंत कमी असतो.
जालना जिल्ह्यात यावर्षी रब्बी हंगामात 865 एकर क्षेत्रावर चियाची लागवड करण्यात आली होती. कमी मशागत, कमी पाणी आणि अवघ्या 100 ते 110 दिवसांत हातात येणारे पीक यामुळे शेतकरी हे पीक घेत असल्याचे दिसून येत आहे.
चिया सिड्समध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिड, फायबर आणि प्रोटिनचे प्रमाण भरपूर असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत याला मोठी मागणी आहे. यामुळेच शेतकऱ्यांना स्थानिक व्यापाऱ्यांकडून चांगला दर मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांचा ओढा चिया पिकाकडे वाढला असल्याचे दिसून येत आहे.
आर्थिक ताळेबंद (प्रति एकर)
शेतकऱ्यांनी मांडलेला चिया शेतीचा हिशोब इतर पिकांच्या तुलनेत थक्क करणारा आहे:
उत्पादन खर्च: अवघा 7,000 रुपये.
सरासरी उत्पादन: 4 ते 6 क्विंटल.
बाजारभाव: 18,000 रुपये प्रति क्विंटल.
एकूण उत्पन्न : 5 क्विंटल (सरासरी) 18,000 = 90,000 रुपये.
निव्वळ नफा : 90,000 - 7,000 = 83,000 रुपये.
चिया या परदेशी पिकांची लागवड या वर्षी आत्माच्या मार्गदर्शनाखाली केली असून विविध ठिकाणी प्रशिक्षण व अभ्यासदौरे यामुळे तंत्रज्ञान मिळाले आणि त्याचा मोठा आर्थिक फायदा झाला.
दत्ता कदम, शेतकरी, मोतीगव्हाण.
कमी दिवसात येणारे आणि बाजारपेठेत मोठी मागणी असल्याने स्थानिक व्यापाऱ्यांकडून देखील शेतकऱ्यांनि पिकविलेल्या चिया पिकाला चांगला दर मिळत आहे.
अमोल आगवण, प्रकल्प संचालक आत्मा जालना.