

जालना: राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या निकालात जालन्यातून एक मोठी आणि तितकीच चर्चेत असणारी बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश हत्या प्रकरणातील संशयित आरोपी श्रीकांत पांगरकर याने जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे. प्रभाग क्रमांक १३ मधून अपक्ष म्हणून लढताना पांगरकरने भाजपच्या उमेदवाराला पराभवाची धूळ चारली आहे.
श्रीकांत पांगरकर हा राजकारणात नवीन नाही. २००१ ते २००६ या काळात तो अविभाजित शिवसेनेचा नगरसेवक होता. मात्र, २०११ मध्ये शिवसेनेने उमेदवारी नाकारल्यानंतर त्याने हिंदु जनजागृती समितीशी जवळीक साधली होती. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता, परंतु तीव्र जनक्षोभामुळे त्याचे सदस्यत्व स्थगित करण्यात आले होते. अखेर कोणत्याही पक्षाची साथ न घेता पांगरकरने 'अपक्ष' म्हणून नशीब आजमावले आणि त्यात तो यशस्वी ठरला.
बेंगळुरू येथे गौरी लंकेश यांची ५ सप्टेंबर २०१७ रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात कर्नाटक पोलिसांनी पांगरकरला संशयित आरोपी म्हणून अटक केली होती. २०१८ मध्ये महाराष्ट्र एटीएसने (ATS) राज्यभरात जप्त केलेल्या बॉम्ब आणि शस्त्रसाठा प्रकरणातही पांगरकरचे नाव समोर आले होते. त्यानंतर सप्टेंबर २०२४ मध्ये कर्नाटक उच्च न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला होता. अद्याप त्याच्यावरील दोष सिद्ध झालेले नाहीत.
प्रभाग १३ मध्ये श्रीकांत पांगरकर विरुद्ध भाजप अशी थेट लढत होती. विशेष म्हणजे, या मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आपला उमेदवार रिंगणात उतरवला नव्हता, ज्याचा फायदा पांगरकरला झाल्याचे बोलले जात आहे. या विजयामुळे जालना मनपाच्या राजकारणात आता नवीन चर्चांना उधाण आले आहे.