

जालना ः जालना महापालिका निवडणुकीत अनेक वॉर्डांत प्रतिष्ठेच्या लढती झाल्याने कोण विजयी होणार यासह कोणत्या पक्षाच्या जागा अधिक येणार याकडे नेत्यांसह मतदारांचे लक्ष लागले आहे.निवडणुकीत भाजप सर्वाधिक जागा जिंकून प्रथम क्रमांकाचा पक्ष बनण्याची शक्यता असली तरी महापालिकेत बहुमत कोणत्याही पक्षाला मिळण्याची शक्यता कमी दिसत आहे.
जालना महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 1 मधून भाजपा शहर महापालिका अध्यक्ष भास्करराव दानवे व त्यांच्या पत्नी सुशिला दानवे या निवडणूक लढवित आहेत. या वॉर्डातील निवडणूक प्रतिष्ठेची समजली जात आहे. प्रभाग क्रमांक 9 मधून भाजपाचे महावीर ढक्का व शिवसेना शिंदे पक्षाचे विष्णू पाचफुले यांच्यातील लढत तुल्यबळ होण्याची शक्यता आहे.
भाजपामधे प्रवेश केलेल्या माजी आ.कैलाश गोरंट्याल यांच्या पत्नी संगीता गोरंट्याल या 6 प्रभागातून तर त्यांचा मुलगा प्रभाग क्रमांक 5 मधून गोरंट्याल यांचा मुलगा अक्षय गोरंट्याल यांनी निवडणूक लढविली आहे. या निवडणुकीचा निकालही महत्त्वाचा व लक्षवेधी ठरणार आहे. शिवसेनेचे आ.अर्जुनराव खोतकर यांची मुलगी दर्शना हिने प्रभाग क्र.16 मधून निवडणूक लढविली असून या निवडणूक निकालाकडेही सर्वांचे लक्ष राहणार आहे.
जालना महापालिकेची ही पहिलीच निवडणूक असल्याने महापौर आपल्याच पक्षाचा व्हावा यासाठी सर्वच पक्षाचे नेते सक्रिय झाले आहेत.शहरातील काही प्रभागात धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.मुस्लिम बहुल भागात मतदारांची मतदानासाठी मोठी गर्दी दिसून आली.
बहुमत मिळण्याची शक्यता धुसर
जालना शहर महापालिका निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळणार नसल्याचे चित्र दिसत आहे. भाजपाचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी गुरुवारी महापालिका निवडणुकीचे मतदान सुरू असतानाच भाजपा व शिवसेना हे मित्र पक्ष असून निकालानंतर ज्या पक्षाचे अधिक उमेदवार त्या पक्षाचा महापौर हा फार्म्युला ठरला असल्याचे सांगितले. त्यामुळे निकालानंतर भाजपाला बहुमत न मिळाल्यास भाजपा व शिवसेना पुन्हा एकत्र येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.