

Sugar Commissioner issues notice to Samarth's Unit 2
जालना, पुढारी वृत्तसेवाः घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथील कर्मयोगी अंकुशराव टोपे सहकारी साखर कारखाना युनिट क्र २ ने २०२४-२५ मधे गाळप केलेल्या ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना रास्त व किफायती दराने पैसे न देता ३१ मे २०२५ अखेर १२ कोटी ६४ लाख रुपये थकीत ठेवल्याने कारवाई करण्यात का येऊ नये अशी नोटीस पुणे येथील साखर आयुक्तांनी कारखाण्याला बजावली आहे. या प्रकरणी गुरुवार (१९) रोजी पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयात सुनवणी ठेवण्यात आली आहे.
घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथील कर्मयोगी अंकुशराव टोपे सहकारी साखर कारखाना युनिट क्र २ ने २०२४-२५ मधे ऊसाचे गाळप केल्यानंतर चौदा दिवसात शेतकऱ्यांना एफआरपी प्रमाणे पैसे देणे बंधनकारक आहे. मात्र हंगाम संपल्यानंतर ३१ मे २०२५ पर्यंत ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे देण्यात न आल्याने काही शेतकऱ्यांनी याबाबत पुणे येथील साखर आयुक्तांकडे तक्रार केल्यानंतर या तक्रारीची दखल घेत साखर आयुक्तांनी कारखान्याला नोटीस दिली आहे.
या नोटीसमध्ये चौदा दिवसांत ऊस उत्पादकांना एफआरपी प्रमाणे पैसे देणे बंधनकारक असतानाही पैसे न दिल्याने विलंब कालावधीकरिता १५ टक्के व्याज आकारण्याची तरतूद असलचे नमूद केले आहे. या प्रकरणी गुरुवार (१९) रोजी पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयात सुनावणी निश्चित करण्यात आली आहे. कारखाण्याच्या कार्यकारी संचालकांनी या प्रकरणी लेखी म्हणने मांडण्याचे नोटीसमधे कळविण्यात आले आहे.