

Jalna Fraud of five and a half lakhs
जालना, पुढारी वृत्तसेवा : धुळे जिल्ह्यातील पेरेजपूर येथील एका जणास एक लाखाचे एक कोटी करून देतो असे सांगून त्याच्यासह पुतण्याची साडेपाच लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या जालना शहरातील आरोपीस पोलिसांनी जेरबंद करीत त्याच्या ताब्यातून १ लाख ४९ हजार रुपये जप्त केले. या प्रकरणी तालुका जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धुळे जिल्ह्यातील पेरेजपूर (ता. साक्री) येथील किशोर पंडित शेवाळे या शेतकऱ्याने तालुका जालना पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, जालना शहरातील भक्तेश्वर नगर येथे रा-हणाऱ्या आरोपी रतन आसाराम लांडगे या भोंदु बाबाने एक लाख रूपयाचे एक कोटी रुपये करून देतो असे आमिष दाखवून त्यांच्याकडून ३ लाख रुपये व त्यांच्या पुतण्याकडून २ लाख ५० हजार रुपये घेतले.
त्यानंतर आरोपीने त्याच्या राहत्या घरामध्ये त्यांच्यासमक्ष जादूटोण्याचे प्रयोग करून दाखवीत साडेपाच लाखांची फसवणूक केल्याची तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी गुन्ह्यातील आरोपी नामे रतन आसाराम लांडगे याच्या राहत्या घराची व गुन्ह्यातील घटनास्थळाची दोन शासकीय कर्मचारी व पंचासमक्ष झडती घेतली असता या ठिकाणी आरोपीसह पदमनाभजयप्रकाश राणे (व्यवसाय निर्माता, रा. द नेस्ट कॉ. ऑप. सोसायटी, मुंलूड पश्चिम, मुंबई) विकास वसंत अनभवने (रा. कोकण नगर, भांडूप, पश्चिम, मुंबई), नारायण गजानन जोशी (व्यवसाय चहाची टपरी, रा. साईप्लाझा बिल्डींग, रूम नं. ११ विरार पश्चिम, मुंबई) हे सदर इसमा सोबत १ लाख रुपये घेऊन आलेले होते.
त्यांना आरोपीने एक लाखाचे ३ करोड करून देतो असे आमिष दाखवलेले होते. तसेच आरोपीच्या घराची घर झडती घेतली यावेळी घरात एक लोखंडी जाडीचा पिंजरा, लाकडाची विना, पितळाची मोठी समयी, काळ्यारंगाच्या भालुचा मास्क, एक चमड्याची मॅट ज्यावर वाघाचे चित्र आहे, मानव हाडासारखी कवटीचा आकार अस-लेली प्लास्टीकची छडी, दोन पाय व दोन हात, पाच बोट असलेला प्लास्टिक्चा पंजा, स्टीलचा हळद, कुंकुवाचे पंचपाळ, चार नारळ, हदळ, कुंकुची एक-एक पुडी, एक स्टीलचा तांब्या व स्टीलचा एक लहान ग्लास, काळयारंगाची कपड्याची बाहुली, एक स्टीलचा कोयता ज्याची मूठ अंखड असून त्यावर घोड्याचे चिन्ह आहे, भगव्या रंगाचा महाकाल लिहलेला कुर्ता, एक चाकू ज्याची लाकडी मूठ आहे, लाल रंगाचा कापड, भगव्या रंगाचा ज्यावर महाकाल असे लिहलेला रूमाल, तीन पांढऱ्या गोण्यामध्ये नोटेच्या आकाराचे कापलेले कोऱ्या कागदांचे बंडल तसेच एका गोणीमध्ये सोळा बंडलवर प्रत्येकी एक ५०० रू दराच्या नोट लावलेली होती.
जालना शहरात पैशाचा पाऊस पाडण्यासह जादा पैसे करुन देण्याचे गुन्हे यापुर्वीही उघडकीस आले आहेत. चांगल्या घरातील व मोठ-मोठ्या शहरातील नागरीक अशा प्रकारात बळी जात असल्याने आश्चर्य व्यकत होत आहे.