

Shivar Srishti concept ganpati decoration
जाफराबाद, पुढारी वृत्तसेवा : येथील बालाजी पार्क मधील रहिवासी शिक्षक पंकज पाटील यांनी सालाबादप्रमाणे याही वर्षी आपल्या घरगुती गणपती बाप्पा साठी शेतकरी राजा शिवारसृष्टी या संकल्पनेवर आधारित आकर्षक आरास सादर केली आहे. यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
जाफराबाद शहरासह तालुक्यांमध्ये विघ्नहर्ता गणरायाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. घरोघरी देखील गणेश भक्तांनी आकर्षक आरास बनवून गणरायाची मूर्ती स्थापना केली. जाफराबाद शहरातील जिल्हा परिषद शिक्षक पंकज पाटील दरवर्षी गणेशोत्सव आणि दिवाळीनिमित्त आगळीवेगळी संकल्पना घेऊन आकर्षक आरास आणि प्रतिकृती तयार करत असतात.
त्यांनी यावर्षी तयार केलेल्या सदरील देखाव्यामध्ये शेतकऱ्याला पार पाडाव्या लागणाऱ्या पेरणीपासून ते सोंगणी पर्यंतच्या विविध गोष्टी प्रतीकात्मक दर्शवण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच विहीर, शेततळे, शेडनेट, मचान यासारख्या बाबी सुद्धा आकर्षक पद्धतीने दाखवल्या आहेत. एवढेच नव्हे तर शेतकऱ्याचे वर्षभरातील सर्वात महत्त्वाचे सण बैलपोळा व वेळा अमावस्या याची मांडणी लक्ष वेधून घेते.
पंकज पाटील यांनी या अगोदर नारळातील गणपती, श्री केदारनाथ धाम यासारखे घरगुती गणपतीचे देखावे तयार केले आहेत. सोबतच दरवर्षी ते दिवाळी सनानिमित्त विविध आकर्षक किल्ल्यांची प्रतिकृती देखील साकारतात. यानिमित्ताने आतापर्यंत त्यांनी किल्ले शिवनेरी, प्रतापगड, तोरणा, सिंहगड यासारखे किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार केलेले आहेत. या कामासाठी पंकज पाटील यांच्या पत्नी भाग्यश्री पाटील आणि त्याची मुले ही देखील त्यांना सहकार्य करतात. देखावा पाहण्यासाठी शहर व तालुक्यातून नागरिक येत आहे.