

Follow electrical safety rules, avoid accidents, Mahavitaran appeals to citizens
जालना, पुढारी वृत्तसेवा: पावसाळ्यात पाऊस किंवा पूरपरिस्थिती, झाडे व फांद्या कोसळल्याने तुटलेल्या वीजतारा, विजेची उपकरणे किंवा यंत्रणेमधील शॉर्टसर्किट आदींमुळे विद्युत अपघात होण्याची शक्यता असते. नागरिकांनी विद्युत सुरक्षेचे नियम पाळुन सार्वजनिक व घरगुती विद्युत यंत्रणा, उपकरणांपासून सावध राहावे असे आवाहन महावितरणच्यावतीने करण्यात आले आहे.
नागरीकांनी विजेची उपकरणे, स्विच बोर्ड किंवा भिंती ओल्या असतील तर त्यांना हात लावू नये, ओलसर हातांनी उपकरणे वापरणे टाळा. खिडक्या आणि बाल्कनीपासून विजेची उपकरणे दूर ठेवा. घरातील मीटरजवळ पाणी झिरपत असल्यास, तात्काळ मेन स्विच बंद करा आणि लगेच महावितरणला कळवा. मेन स्विचमध्ये चुकूनही तांब्याची तार वापरू नका. त्याऐ-वजी, वीजभाराला साजेसे अॅल्युमिनियम अलॉयचे विशिष्ट धातूचे फ्यूज वायर वापरा. यामुळे शॉर्ट सर्किट झाल्यास वीजपुरवठा आपोआप खंडित होईल आणि मोठा धोका टळेल.
घरातील वायरिंग जुनी झाली असेल तर त्वरित अधिकृत परवानाधारक कंत्राटदाराकडून ती तपासून घ्यावी. खराब झालेली वायरिंग तात्काळ बदलून घ्या. वायरची जोडणी करताना ती तुकड्या-तुकड्यांमध्ये जोडू नका. जोडणी करावी लागल्यास चांगल्या इन्सुलेशन टेपचा वापर करावा. वीजजोडणीसाठी 'आयएसआय' प्रमाणित साहित्यच वापरा. यात कोणतीही तडजोड करु नका.
मिक्सर, हिटर, गिझर यांसारख्या उपकरणांसाठी श्री-पिन सॉकेट वापरा, कारण त्यात अर्थिंगची व्यवस्था असते. घराबाहेरही विजेचे धोके दडून असतात. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी वादळामुळे तुटलेल्या किंवा झुकलेल्या वीजतारा, खांब, रोहित्राचे कुंपण, फ्यूज बॉक्स यांसारख्या गोष्टींपासून सुरक्षित अंतर राखा. तुटलेल्या तारांना अजिबात हात लावू नका किंवा त्या हटवण्याचा प्रयत्न करू नका. विजेच्या खांबांना किंवा स्टे वायरला जनावरे बांधू नका, दुचाकी टेकवू नका किंवा कपडे वाळत घालू नका. शेतातील तारेच्या कुंपणात विद्युत प्रवाह सोडू नका. विद्युत वाहीनीच्याखाली किंवा जवळ कोणतेही बांधकाम करू नका, असे अवाहन महावितरणने केले आहे.
वीजपुरवठा खंडित झाल्यास किंवा तांत्रिक बिघाड झाल्यास शहरी आणि ग्रामीण भागातील ग्राहक १९१२ किंवा १९१२०, १८००-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ या २४ तास उपलब्ध असलेल्या टोल फ्री क्रमांकांवर तक्रार दाखल करू शकतात. वीजप-रवठा खंडित झाल्यास लगेचच फोन न करता १५ ते २० मिनिटे वाट पाहून महावितरणला संपर्क करावा. वादळामुळे किंवा अतिवृष्टीमुळे तांत्रिक बिघाड होऊन दुर्घटना होण्याची शक्यता असलेल्या ठिकाणांची माहितीही या क्रमांकांवर देऊ शकता.