

देऊळगाव राजा : शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांनी बैठकीनंतर सत्कार करण्यास सांगितल्याने संबंधित पदाधिकारी बैठकीत सहभागी झाले. मात्र बैठक संपल्यानंतर तालुकाप्रमुख सुदाम काकड यांनी कोणताही सत्कार होणार नसल्याचे सांगितल्याने काही पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त झाली. सत्काराचा प्रयत्न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना तो स्वीकारला जाणार नसल्याचे सांगण्यात आल्याची चर्चा यावेळी झाली.
दरम्यान, शिवसेना (शिंदे गट) पक्ष बांधणीच्या पार्श्वभूमीवर सिंदखेडराजा मतदारसंघातील कार्याचा आढावा घेण्यासाठी देऊळगाव राजा येथील जालना-देऊळगाव राजा रोडवरील इंद्रायणी हॉटेलमध्ये महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. लोकसभा संपर्कप्रमुख म्हणून नुकतीच निवड झालेल्या संजय सोनार यांच्या मार्गदर्शनासाठी ही बैठक घेण्यात आली होती. बैठकीचे आयोजन माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी केले होते.
बैठकीस शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख बळीराम मापारी, युवासेना जिल्हाप्रमुख ऋषी जाधव यांच्यासह देऊळगाव राजा तालुक्यातील अनेक शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते. पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने ही मार्गदर्शन व आढावा बैठक पार पडली. दरम्यान, देऊळगाव राजा तालुकाप्रमुख सुदाम काकड यांनी काही आजी-माजी पदाधिकाऱ्यांना बैठकीची पूर्वसूचना दिली नसल्याची चर्चा स्थानिक कार्यकत्यांमध्ये होती. याची माहिती मिळाल्यानंतर माजी उपजिल्हाप्रमुख दीपक बोरकर, माजी तालुकाप्रमुख अनिल चित्ते, महिला आघाडीच्या शहरप्रमुख पूजा खांडेभरे यांच्यासह सुमारे ५० ते ६० पदाधिकारी बैठकीदरम्यान तेथे उपस्थित झाले.
कार्यकर्त्यांनी दिल्या घोषणा
यावेळी कार्यकत्यांनी "एकनाथ शिंदे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, "शिव-सेना जिंदाबाद", "प्रतापराव जाधव आणि संजय सोनार तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणाबाजी केल्या. तसेच नव्याने जबाबदारी मिळालेल्या संजय सोनार यांचा सत्कार करण्यासाठी त्यांनी जिल्हाप्रमुख बळीराम मापारी यांच्याकडे परवानगी मागितली. या प्रकारामुळे सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेतील अंतर्गत मतभेद उघडपणे समोर आल्याचे चित्र दिसून आले. पक्षासाठी मेहनत घेणाऱ्या कार्यकर्त्यांना दुय्यम वागणूक दिली जात असल्याची भावना बोलून दाखवली