

- कूपनलिकांसाठी कठोर परवानगी प्रणाली लागू करावी
- पावसाचे पाणी साठवण (रेनवॉटर हार्वेस्टिंग) बंधनकारक करावे
- जलसंधारण प्रकल्पांना गती द्यावी
- भूगर्भजल पातळीचे नियमित सर्वेक्षण करावे
- नागरिकांमध्ये पाणी बचतीबाबत जनजागृती वाढवावी
जालना : जालना जिल्ह्यात अनिर्बंध कूपनलिका (बोअरवेल) व विहिरीच्या वाडल्या संख्येमुळे भूगर्भजल पातळी धोकादायकरीत्या खालावत चालली असून, अक्षरशः भूगर्भाची 'चाळणी' झाली आहे. मात्र या गंभीर परिस्थितीकडे प्रशासन अनभिज्ञ असल्याचे चित्र समोर येत आहे.
जिल्ह्यात गेल्या काही वर्षात शेती, उद्योग व नागरी भागातील वाढत्या पाण्याच्या गरजेमुळे मोठ्या प्रमाणावर कूपनलिका खोदल्या जात आहेत. कोणतीही ठोस परवानगी प्रक्रिया किंवा नियंत्रण नसल्याने शेतकरी व व्यावसायिक मनमानी पद्धतीने खोलवर बोअरवेल येत आहेत. परिणामी, जमिनीतील पाण्याचे नैसर्गिक संतुलन ढासळत आहे. दरम्यान, रोजगार हमी योजनेच्या विहिरीसाठी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे आवश्यक असलेली अट देखील काढून घेतल्या गेल्यामुळे जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात विहिरींचे खोदकाम झाले. परिणामी, जमिनीची चाळणी चाळणी झाली असल्याचे दिसून येत आहे.
पावसाचे प्रमाण घटलेलेअसताना भूगर्भजलाचा अतिरेकाने उपसा सुरू राहिल्यास येत्या काळात भीषण जलसंकट ओढवू शकते. अनेक गावांत विहिरी कोरड्या पडण्यास सुरुवात झाली असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनत आहे. ग्रामीण भागात पाणीटंचाई वाढण्याची दाट शक्यता आहे. यासाठी सुमारे १६.४९ कोटींचा पाणी टंचाई आराखडा तयार करण्यात्त आला आहे. पिकांना पाणी न मिळाल्याने उत्पादन घटत असून, आर्थिक अडचणी वाहत आहेत. तरीही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई किंवा जनजागृती मोहीम राबवली जात नसल्याची नाराजी नागरिकांतून व्यक्त होत आहे.
दरम्यान, जालना जिल्ह्यात नियमबाह्य कूपनलिका व विहिरीच्या अक्राळविक्राळ बाढीमुळे भूगर्भाची चाळणी झाली असून, प्रशासनाच्या अनभिज्ञतेमुळे भयावह जलसंकट निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाचे नियम धाब्यावर बसवून ८०० फुटांपर्यंत अनधिकृत उपसा होत असल्याने भूजल पातळी खालावली आहे. शिवाय, खोलवर पाणी जात असल्यामुळे गुणवत्तापूर्ण पाणी मिळत नाही. जिल्हघातील काही भागात पिण्यास अयोग्य पाणी आहे. तरी देखील नागरिक ते पाणी पितात. काही ठिकाणी फ्लोईडचे प्रमाण असलेली प्रकरणे देखील पुढे आली होती. ही गंभीर बाब आहे. यामुळे कूपनलिका आणि नवीन विहिरी घेण्यावर काही अंशी निर्बंध घातल्यास या प्रकाराला आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केल्या जात आहे.
यावर उपाय: भूजल पुनर्भरण
कूपनलिका पुनर्भरणः कूपनलिकेच्या केसिंग पाइपला छिद्रे पाडून, सभोवताली खडी आणि रेतीचा गाळण खड्डा तयार करून पावसाचे पाणी जमिनीत सोडावे. विहीर पुनर्भरणः शेतातील वाहते पाणी गाळण यंत्रणेद्वारे विहिरीत सोडून भूजल पातळी वाढवता येते. गाळण यंत्रष्णा: पाणी थेट जमिनीत सोडण्याऐवजी दगड, गोटे आणि बाळूच्या थरातून गाळून सोडल्यास भूगर्भातील पाण्याचा दर्जा राखला जातो.
अजून जिल्हा प्रशासनाकडे एकत्रित कूपनलिकांची अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही. शहर, ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कूपनलिका घेण्यात आल्या आहेत. या बाबतीत स्थानिक स्वराज्य संस्था, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, ग्रामीण पाणीपुरवठा जिल्हा परिषद आणि पाणी गुणवत्ता या संदर्भात अन्न आणि औषध प्रशासन या सर्व विभागांशी चर्चा करून यावर काय तोडगा काढता येईल, ते ठरवण्यात येईल.
- शशिकांत हदगल, निवासी उपजिल्हाधिकारी, जालना.