

Selling firecrackers on the streets in the city
जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना शहरातील विविध रस्त्यावर नियमांचे उल्लंघन करीत खुलेआम फटाक्याची विक्री सुरु असल्याने दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने केवळ कागदी घोडे नाचवित कारवाईचा इशारा दिला असला तरी प्रत्यक्ष कारवाई होण्याची गरज आहे.
दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर जालना शहरासह जिल्ह्यात फटाक्यांची अवैध विक्री नये, उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हा करू प्रशासनाच्यावतीने देण्यात आले होते. मात्र, या आदेशाची जिल्ह्यात कुठेच अंमलबजावणी होतांना दिसत नसल्याचे चित्र आहे. जालना शहर व जिल्ह्यातील विविध तालुक्यात फटाक्यांची रस्त्यावर विक्री सुरु असल्याचे दिसत आहे. काही ठिकाणी फटाके विक्री करणाऱ्यांनी दुकानेही थाटली आहेत. रस्त्यावर विक्री होणाऱ्या अवैध फटाक्यांमुळे दुर्घटनेची शक्यता असल्याने प्रशासनाने जागृक राहणे गरजेचे आहे.
प्रशासनाच्यावतीने कारवाईचा इशारा देऊनही अवैध फटाका विक्रेत्या विरुद्ध ठोस कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दिवाळीत रस्त्यावर विक्री होणाऱ्या फटाक्यामुळे एखादी दुर्घटना झाल्यानंतर कारवाईचा बडगा उगारणे कितपत योग्य राहणार आहे या बाबत चर्चा होतांना दिसत आहे.